नॅशनल हेरॉल्ड प्रकरण : सोनिया गांधींची चौकशी पुढील महिन्यात | पुढारी

नॅशनल हेरॉल्ड प्रकरण : सोनिया गांधींची चौकशी पुढील महिन्यात

नवी दिल्‍ली, वृत्तसंस्था : काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना ईडीने (अंमलबजावणी संचालनालय) आता जुलैमधील तारीख दिली आहे. नॅशनल हेरॉल्ड वृत्तपत्रातील कथित मनी लाँडरिंग प्रकरणाची ईडी चौकशी करीत असून, त्याच संदर्भात सोनिया गांधी यांना 23 जून रोजी हजर राहण्याचे समन्स बजावले होते. तथापि, प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी वेळ वाढवून मागितला होता. त्यानंतर गुरुवारी ईडीने चौकशी पुढे ढकलून जुलैच्या दुसर्‍या पंधरवड्यात हजर होण्याचे समन्स त्यांना बजाावले.

काय आहे प्रकरण?

पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ‘नॅशनल हेरॉल्ड’ वृत्तपत्र स्थापन केले होते. पण हे वृत्तपत्र २००८ मध्ये बंद पडले. त्यानंतर हे वृत्तत्रप यंग इंडिया कंपनीने विकत घेतले. काँग्रेसकडून नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राला ९० कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले होते. या वृत्तपत्राच्या कथित आर्थिक अनियमिततेच्या चौकशीसाठी नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २०१२ मध्ये सुब्रमण्यम स्वामी यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह मोतीलाल व्होरा, ऑस्कर फर्नांडिस, सुमन दुबे आणि सॅम पित्रोदा यांच्यावर नॅशनल हेराल्डची मालकी मिळवण्यासाठी फसवणूक आणि निधीचा गैरवापर केल्याचा आरोप केला होता. त्यांनी या प्रकरणी खटला दाखल केला होता.

Back to top button