‘पीएफ’वरील व्याज दरात घट! | पुढारी

‘पीएफ’वरील व्याज दरात घट!

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : आर्थिक वर्ष 2021-22 साठी ईपीएफ खात्यात जमा असलेल्या रकमेवर अखेर 8.50 ऐवजी 8.10 टक्के दराने व्याज देण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे. ‘एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन’ने शुक्रवारी तसे कार्यालयीन आदेश जारी केले.

हा दर गेल्या 40 वर्षांतील सर्वांत किमान दर आहे. 1977-78 मध्ये ‘ईपीएफ’ने 8 टक्के व्याज दिले होते. त्यानंतर 8.25 टक्के वा त्याहून थोडा अधिक व्याज दर राहिलेेला आहे. गेली 2 आर्थिक वर्षे पाहता (2019-20 आणि 2020-21) व्याज दर 8.50 टक्के राहिलेला आहे. देशातील जवळपास 6 कोटी कर्मचारी ‘ईपीएफ’च्या कक्षेत आहेत.

कर्मचार्‍याचे मूळ वेतन अधिक ‘डीए’चे 12 टक्के ईपीएफ खात्यात जमा होतात. कंपनीही कर्मचार्‍याचे मूळ वेतन अधिक ‘डीए’च्या 12 टक्के रक्कम जमा करते. कंपनीच्या 12 टक्के वाट्यातूनच 3.67 टक्के कर्मचार्‍याच्या पीएफ खात्यात जमा होतात. बाकीची 8.33 टक्के रक्कम कर्मचारी निवृत्ती वेतन योजनेत जमा होते. तुमच्या खात्यात 31 मार्च 2022 पर्यंत एकूण 5 लाख रुपये जमा आहेत आणि 8.50 टक्के दराने व्याज मिळाले तर 5 लाखांवर तुम्हाला 42,500 रुपये व्याजापोटी मिळतील. पण आता व्याज दर 8.10 टक्के केल्यानंतर व्याज 40,500 रुपये एवढेच मिळेल.

वर्षनिहाय व्याज दर

1952 मध्ये पीएफ व्याज दर 3 टक्के होता.
1972 मध्ये तो 6 टक्केवर गेला
1984 मध्ये पहिल्यांदा
10 टक्केवर गेला.
1989 ते 1999 दरम्यान पीएफवर 12 टक्के व्याज मिळत असे.
1999 नंतर व्याज दर कधीही 10 टक्केवर गेला नाही.
2001 नंतर 9.50 टक्केपेक्षा कमीच राहिला.
गेल्या 7 वर्षांपासून 8.50 टक्के किंवा त्यापेक्षा कमीच व्याज दर आहे.

Back to top button