सर्व ४२४ व्हीआयपींना ७ जूनपासून सुरक्षा देणार : भगवंत मान | पुढारी

सर्व ४२४ व्हीआयपींना ७ जूनपासून सुरक्षा देणार : भगवंत मान

जालंधर; वृत्तसंस्था : पंजाबचे सुप्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर सुरक्षावापसीच्या मुद्द्यावरून पंजाबमधील मान सरकार बॅकफूटवर आले आहे. या प्रकरणात उच्च न्यायालयात गेलेल्या माजी मंत्री ओ. पी. सोनी यांच्या याचिकेवर मान सरकारने सांगितले की, 7 जून रोजी सर्व 424 व्हीआयपींना पुन्हा सुरक्षा बहाल केली जाईल.

उच्च न्यायालयाने पंजाब सरकारच्या वकिलाला विचारले की, ज्या लोकांना सुरक्षाकवच दिले गेले आहे, त्यात कपात का करण्यात आली होती? त्यामागे काही विशेष कारण होते का? त्यावर सरकारी वकिलांनी सांगितले की, 1984 च्या ‘ऑपरेशन ब्लू स्टार’चा वर्धापनदिन 6 जून रोजी आहे. त्यामुळे अतिरिक्त बलाची आवश्यकता असल्याने या 424 व्हीआयपींच्या सुरक्षाव्यवस्थेत तात्पुरती कपात केली होती.

सर्वांना एक-एक गनमॅन दिला आहे का, असे विचारत न्यायालयाने सांगितले की, ज्यांची सुरक्षाव्यवस्था परत घेतली गेली आहे, त्यांना दोन-दोन सुरक्षारक्षक द्या. जर कुणाला त्यापेक्षा जास्त सुरक्षारक्षक हवे असतील तर त्यांचा खर्च स्वतः संबंधित व्हीआयपींनी करावा.

न्यायालयाने विचारले की, ज्या व्हीआयपींच्या सुरक्षेत कपात केली त्यांची यादी बाहेर कशी आली? त्यावर सरकारी वकिलांनी सीलबंद लिफाफ्यात अहवाल दिला. त्यावर न्यायालयाने अशा संवेदनशील प्रकरणात सरकारने विचार केला पाहिजे, असे सुनावले.

40 व्हीआयपी, धर्मगुरूंना पुन्हा पुरवली सुरक्षाव्यवस्था

दरम्यान, मुसेवाला यांच्या हत्येनंतर मान सरकारने 40 व्हीआयपींना तातडीने पुन्हा सुरक्षाव्यवस्था बहाल केली होती. मान सरकारने या व्हीआयपींच्या सुरक्षाव्यवस्थेचा दर महिन्याला आढावा घेण्याचा तसेच जे व्हीआयपी सुरक्षेची मागणी करतील त्यांना तत्काळ सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने धर्मगुरूंना पुन्हा सुरक्षाव्यवस्था बहाल करत त्यांना अतिरिक्त सुरक्षा आणि वाहने दिली जाणार आहे.

Back to top button