पेट्रोल-डिझेल इंधन दरात पुन्हा जबर वाढ! | पुढारी

पेट्रोल-डिझेल इंधन दरात पुन्हा जबर वाढ!

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडून आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी पेट्रोलच्या दरात २६ पैशांची तर डिझेल दरात ३३ पैशांची जबर वाढ करण्यात आली. ताज्या दरवाढीनंतर डिझेलचे दर ८२ रुपयांच्या वर गेले आहेत. 

आठ दिवसांपूर्वी प. बंगालसह पाच ठिकाणच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आले होते. त्यापाठोपाठ चार दिवस तेल कंपन्यांकडून इंधन दरात वाढ करण्यात आली होती. शनिवार-रविवार वगळता ही दरवाढ अजूनही सुरूच आहे. ताज्या दरवाढीनंतर देशाची राजधानी दिल्लीतील पेट्रोलचे प्रती लीटरचे दर ९१.५३ रुपयांवर गेले असून डिझेलचे दर ८२.०६ रुपयांवर गेले आहेत. मुंबईत पेट्रोलचे दर ९७.८६ रुपयांवर तर डीझेलचे दर ८९.१७ रुपयांवर गेले आहेत. कोलकाता येथे इंधन दर क्रमश: ९१.६६ आणि ८४.९० रुपयांवर तर चेन्नई येथे हेच दर क्रमशः ९३.६० आणि ८६.९६ रुपयांवर गेले आहेत. 

गेल्या काही काळात कच्च्या तेलाच्या दरातही वाढ नोंदविण्यात आलेली आहे. जागतिक बाजारपेठेत ब्रेंट क्रूड तेलाचे दर ६९ डॉलर्स प्रती बॅरलवर गेले असून डब्ल्यूटीआय क्रूड तेलाचे दर ६५ डॉलर्स प्रती बॅरलवर गेले आहेत. कोरोना संकटामुळे भारतातील इंधन विक्रीवर परिणाम झाला असला तरी अमेरिका आणि ब्रिटनसह देशातील इंधन विक्री विक्रमी स्तरावर पोहोचली आहे. 

Back to top button