थॉमस कप विजेत्या खेळाडूंची पंतप्रधानांनी घेतली भेट | पुढारी

थॉमस कप विजेत्या खेळाडूंची पंतप्रधानांनी घेतली भेट

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा
थॉमस आणि उबेर कप स्पर्धेत विजय प्राप्त केलेल्या खेळाडूंची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि.२२) भेट घेतली. थॉमस कपमध्ये, भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने  विजेतेपद पटकावले. तब्बल ७३ वर्षांनंतर थॉमस कप जिंकण्यात भारताला यश आले आहे. एकवेळ अशी होती की, ज्यावेळी थॉमस चषक स्पर्धेच्या संभाव्य विजेत्या नावांमध्ये भारत खूप मागे असे. असंख्य भारतीय लोकांना या स्पर्धेचे नावदेखील माहित नसावे. मात्र भारतीय खेळाडूंनी हा चषक जिंकल्याने बॅडमिंटन खेळ देशात लोकप्रिय झाला आहे, असे मोदी यांनी यावेळी सांगितले.

मेहनत घेतली तर कोणतेही लक्ष्य प्राप्त करणे कठीण जात नाही हे आपल्या खेळाडूंनी दाखवून दिले आहे, असे सांगत पंतप्रधान पुढे म्हणाले की, दबावातून बाहेर पडून खेळाडूंनी इतिहास रचला आहे. लक्ष्य सेन याने फोनवर मिठाई देऊ सांगितले होते. त्याने आपले आश्वासन पाळले आहे. आज तो माझ्यासाठी मिठाई घेऊन आला आहे. पंतप्रधान मोदी यांनी लक्ष्य सेन याच्यासोबत चिराग आणि एच. एस. प्रणॉय याच्याशी गप्पा मारल्या. अन्नात विषबाधा झाल्याने तीन सामने आपण खेळू शकलो नाही, असे लक्ष्य सेन यावेळी म्हणाला.

चौदावेळच्या विजेत्या इंडोनेशियाला पराभूत करून भारताने पहिल्यांदाच थॉमस चषक जिंकलेला आहे. या स्पर्धेत लक्ष्य सेन, किदांबी श्रीकांतसहित इतर खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली होती. भारताने १९८३ साली क्रिकेटमधील पहिला विश्वचषक जिंकला होता, त्या कामगिरीची तुलना बॅडमिंटन स्पर्धेतील या विजयाशी केली जात आहे.

हेही वाचलत का?

Back to top button