

सांगवी : पुढारी वृत्तसेवा
बारामती तालुक्यातील सांगवी गावात आजपर्यंत पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील विकासकामांच्या निधीची आदळ-आपट होताना ऐकायला मिळत होती. मात्र, आता चक्क आरोग्य विभागाच्या नोकरीचे बनावट नियुक्ती पत्र घेऊन एक उमेदवार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शुक्रवारी (दि.20 ) दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकाराला आरोग्य विभागाकडून दुजोरा मिळाला आहे. या अशा विविध अनोख्या प्रकाराने जिल्हा परिषदेच्या नावाखाली चाललंय काय आणि हे बनावट नियुक्ती पत्र सांगवीपर्यंत पोहचलेच कसे असा सवाल यानिमित्ताने ग्रामस्थांमधून होतो आहे. सांगवी गाव नको त्या कारणावरून गाजत असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गांभीर्याने घेण्याची मागणी सर्वच स्तरातून होते आहे.
सांगवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शुक्रवारी श्रीनाथ मधुकर बंडगर (रा. वीरवाडी नं. 2 मदनवाडी) हे नाव व पत्ता असलेली जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील राष्ट्रीय आरोग्य विभाग अंतर्गत अधिपरिचारक पुरुष ( खुला ) नर्सिंग स्टाफ या पदावर कायमस्वरूपी तत्त्वावर नियुक्ती आदेशाचे पत्र घेऊन दाखल झाला असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. जनार्दन सोरटे यांनी दिली. हे नियुक्ती पत्र व संबंधित व्यक्तीला पंचायत समितीच्या आरोग्य विभागात जाण्यास डॉ. सोरटे यांनी सांगितले. संबंधित व्यक्ती पंचायत समितीच्या आरोग्य विभागात पोहचली नसल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी सांगितले. सांगवीसह होळ प्राथमिक आरोग्य केंद्रात सोनवणे नावाची एक व्यक्ती असेच बनावट नियुक्ती पत्र घेऊन आल्याचे डॉ. खोमणे यांनी स्पष्ट करून जिल्हा परिषदेच्या स्तरावरून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याचे सांगितले.
या बनावट नियुक्ती पत्राबाबत बंडगर याच्यावर बारामती तालुका पोलिस ठाण्यात सांगवी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जनार्दन सोरटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून होळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजगे यांच्या वतीने सोनवणे याच्याविरोधात वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी सांगितली.
बारामती तालुक्यात एकूण नऊ आरोग्य केंद्र आहेत. यापैकी सांगवी व होळ प्राथमिक आरोग्य केंद्रातच ही बनावट नियुक्ती पत्र घेऊन व्यक्ती नेमक्या कुणाच्या सांगण्यावरून दाखल झाल्या आहेत, असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या बनावट नियुक्ती पत्रांचा मुख्य सूत्रधार कोण ? फसवणूक करणार्यांवर कारवाई होणार का ? हे गंभीर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होणार का ? उपमुख्यमंत्री अजित पवार काय आदेश देणार, अशा अनेक प्रश्नांनी काहूर माजले आहे.