कोरोना : हॉटस्पॉट, जास्त घनतेच्या भागातील चाचण्या वाढवा | पुढारी

कोरोना : हॉटस्पॉट, जास्त घनतेच्या भागातील चाचण्या वाढवा

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : कोरोना हॉटस्पॉट तसेच लोकसंख्येची घनता जास्त असलेल्या भागातील चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, असे पत्र केंद्राने राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांना पाठवले आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाचे संकट वाढले आहे. या पार्श्‍वभूमीवर कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्या लोकांच्या चाचण्या घ्याव्यात, असेही सरकारने म्हटले आहे.

महिनाभरात कोरोना रुग्णांची संख्या किती तरी पटीने वाढलेली आहे. सोमवारी देशात 2.38 लाख नवीन रुग्णांची भर पडली होती. रविवारी संक्रमण दर 14.78 टक्के इतका होता, तो सोमवारी कमी होऊन 13.11 टक्क्यांवर आला होता. दिल्ली आणि मुंबई हे कोरोनाचे दोन मोठे हॉटस्पॉट आहेत. तेथे रुग्णसंख्येत वेगाने वाढ झाली होती. मात्र, या शहरांतील परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येत आहे. तरीही कोरोनाचे हॉटस्पॉट तसेच लोकसंख्येची जास्त घनता असलेल्या भागातील चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, असा आग्रह केंद्राने केला आहे.

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) नव्या मार्गदर्शक तत्त्वांमुळे चाचण्या कमी झाल्याचा अंदाज आहे. संक्रमित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांनी चाचण्या करण्याची गरज नसल्याचे काही दिवसांपूर्वी आयसीएमआरने म्हटले होते.

Back to top button