मुलीसाठी तिकीट मागितले, तर चुकीचे काय?: विजय वडेट्टीवार   | पुढारी

मुलीसाठी तिकीट मागितले, तर चुकीचे काय?: विजय वडेट्टीवार  

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : तिकीट कोणाला द्यायचं? हा निर्णय घेण्याचा अधिकार हा हायकमांडलाच आहे. मी माझ्या मुलीसाठी तिकीट मागितले, त्यात दोष काय? मी अनेकांचे नाव सुचवले आहे. उद्यापर्यंत तिकीट वाटप जाहीर होईल. चंद्रपूरसाठी मला हायकमांडने विरोध केलेला नाही, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज (दि.२३) येथे स्पष्ट केले.

भाजपचे माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी ज्या प्रकारे टीका केली ती पाहता असे शब्द वापरणे हे त्यांच्या संस्कृतीत आहे का? हे विचारले पाहिजे, आशिष देशमुख 2019 मध्ये कोणाचे तिकीट मागण्यासाठी आले होते? याचे उत्तर जर त्यांनी दिले, तर ते योग्य होईल, असे   प्रत्युत्तर  वडेट्टीवार यांनी दिले .

काँग्रेस पक्षात जात-पात कधी पाहिली जात नाही. राजकारण करताना काही स्वार्थी माणसे असे विषारी विचार पेरत असतात. गेले 30 ते 35 वर्षांत मी राजकारणात सक्रिय आहे. मी कधी जातीय द्वेष केलेला नाही. ज्या काही पोस्ट व्हायरल होत आहेत, त्या स्वतःच्या स्वार्थासाठी सुरू आहेत. पाच-दहा लोकांच्या टोळक्यांकडून हे धंदे सुरू आहेत. दिवंगत खासदार बाळू धानोरकरांना तिकीट कशी मिळवून दिली, हे सगळ्या लोकांना माहित आहे. आमदार सुधाकर अडबाले संदर्भात मी स्वतः पुढाकार घेऊन त्यांची तिकीट कापली असताना मिळवून दिली, अशा स्थितीत कुणबी समाजाबद्दल व्हायरल पोस्ट होणे दुर्देवी आहे. समाजातील अनेक नेत्यांचे, मान्यवरांचे मला फोन येत आहेत. मी कुठल्याही समाजाचा द्वेष केलेला नाही. बहुजन समाजातील छोट्या कार्यकर्त्याला असा द्वेष करून मोठा होता येत नाही, असा  सल्ला वडेट्टीवार यांनी विरोधकांना दिला.

हेही वाचा 

Back to top button