नागपूर : नेदरलँडच्या कंपनीचा म‍िहानमध्‍ये २०० कोटींचा प्रकल्‍प | पुढारी

नागपूर : नेदरलँडच्या कंपनीचा म‍िहानमध्‍ये २०० कोटींचा प्रकल्‍प

नागपूर, पुढारी वृत्तसेवा :  महाराष्‍ट्र एअरपोर्ट डेव्‍हलपमेंट कंपनी लिमिटेड (एमएडीसी) आणि नेदरलँडची कंपनी कीस्‍टोनमॅब यांच्‍यामध्‍ये खासदार औद्योग‍िक महोत्‍सव – ऍडव्‍हांटेज विदर्भमध्‍ये 200 कोटी रुपयांचा प्रकल्‍प स्‍थापन करण्‍याकरिता सामंजस्‍य करार करण्‍यात आला. ही नागपूर व‍ विदर्भासाठी मोठी उपलब्‍धी मानली जात आहे.

असोसिएशन फॉर इंडस्‍ट्रीयल डेव्‍हलपमेंट (एड) च्‍यावतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्‍या संकल्‍पनेतून खासदार औद्यो‍गिक महोत्‍सव –ऍडव्‍हांटेज विदर्भचे आयोजन करण्‍यात आले आहे. फार्मास्‍युटीकल क्षेत्राच्‍या चर्चासत्रादरम्‍यान एमएडीसी व नेदरलँडच्‍या कंपनीच्‍या अधिका-यांनी या सामंजस्‍य करारावर स्‍वाक्षरी केली. म‍िहान सेझमध्‍ये नेदरलँडची कीस्‍टोनमॅब ही कंपनी नाविन्‍यपूर्ण डोज-फॉर्म सोल्‍युशन्‍सच्‍या निर्मिती प्रकल्‍प स्‍थापन करणार असून याद्वारे 300 लोकांना प्रत्‍यक्ष-अप्रत्‍यक्षरित्‍या रोजगार म‍िळणार आहे. याशिवाय, 300 कोटीचा वार्षिक महसूलदेखील प्राप्‍त होणार आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्‍या उपस्‍थ‍ितीत कीस्‍टोनमॅबचे सीईओ डॉ. तुषार सातव, सीसीओ डॉ. रोलँड मिजेल व एमएडीसी लिमिटेडचे निवृत्‍त अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी प्रकाश पाटील यांनी करारावर स्‍वाक्षरी केली. यावेळी एडचे अध्‍यक्ष आशीष काळे व सचिव डॉ. विजय शर्मा उपस्‍थ‍ित होते. आता निर्यात करण्‍यासाठी मुंबईला जाण्‍याची गरज नसून लॉजिस्‍टीकच्‍या दृष्‍टीने सिंदी ड्रायपोर्ट सारख्‍या उत्‍तम सुविधा येथे उपलब्‍ध आहेत. फार्मा कंपन्‍यांनी याचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन नितीन गडकरी यांनी केले.

हेही वाचा 

Back to top button