Advantage Vidarbha : विदर्भाची बलस्थाने ओळखून विकास : नितीन गडकरींच्या हस्ते ‘अ‍ॅडव्हान्टेज विदर्भ’चे उद्घाटन | पुढारी

Advantage Vidarbha : विदर्भाची बलस्थाने ओळखून विकास : नितीन गडकरींच्या हस्ते 'अ‍ॅडव्हान्टेज विदर्भ'चे उद्घाटन

नागपूर, पुढारी वृत्तसेवा :  विदर्भाच्या औद्योगिक, कृषी आणि अन्य क्षेत्रांचा विकास साधायचा असेल, तर पायाभूत सुविधा बळकट करणे आवश्यक आहे. विदर्भाची बलस्थाने ओळखून विकास करणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. गडकरी यांच्याच संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार औद्योगिक महोत्सव -अ‍ॅडव्हान्टेज विदर्भच्या उद्घाटन प्रसंगी ते संबोधित करीत होते. Advantage Vidarbha

असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट तर्फे स्थानिक नागपूर विद्यापीठाच्या अमरावती रोड परिसरात आयोजित तीन दिवसीय राष्ट्रीय औद्योगिक महोत्सवाचे उद्घाटन आज (दि.२७) दुपारी केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले. Advantage Vidarbha

यावेळी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, खा. डॉ. अनिल बोंडे, खा. अशोक नेते, संरक्षण विभागाचे सल्लागार ले. जनरल विनोद खंडारे, आ. आशिष जयस्वाल, व्हीएनआयटीचे डॉ. प्रमोद पडोळे, आयआयएचे संचालक डॉ. भीमराया मेत्री, कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी, आ. मोहन मते, अॅड. अध्यक्ष आशिष काळे व सचिव डॉ. विजय शर्मा व्यासपीठावर उपस्थित होते.

रस्ते, वीज , पाणी आणि संपर्क सुविधा या औद्योगिक विकासासाठी महत्वाच्या असतात. विदर्भ या सर्व बाबतीत स्वयंपूर्ण होत असून समृद्धी महामार्गसारखे प्रकल्प विदर्भांत गुंतवणूक आकर्षित करतील, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रात कोकण आणि विदर्भ हे मागासलेले क्षेत्र म्हणून चर्चा होते, पण विदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे द्रष्टे आणि विदर्भाविषयी आपुलकी असलेले नेते आहेत, व निसर्गाचे दान देखील भरपूर मिळाले आहे, त्यामुळे आगामी ५ वर्षात आत्मनिर्भर भारतात विकसित विदर्भ दिसेल असा विश्वास केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला.

स्वागतपर भाषण अध्यक्ष आशिष काळे यांनी केले. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सध्या नाागपूर व विदर्भासाठी सुवर्णकाळ असल्याचे सांगितले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, विदर्भ विकासात अ‍ॅडव्हान्टेज विदर्भ मैलाचा दगड सिद्ध होईल, यातून रस्ते, पाणी, वीज, संचारसेवा आणि मुलभूत सोयीसुविधा यांचा लाभ मिळून विदर्भाचा सर्वांगीण विकास होईल, असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी  एएआर इंदेमार आणि नागपुरातील झुलेलाल इन्स्टिट्यूट, प्रियदर्शनी कॉलेज व नागपूर विद्यापीठामध्ये अध्ययन, अध्यापनासाठी सामंजस्य करार करण्यात आला.

रेणुका देशकर, डॉ. बिंदू चिमोटे यांनी  सूत्रसंचालन केले.  सचिव डॉ. विजय शर्मा यांनी आभार मानले.

Advantage Vidarbha  : पुढील वर्षी प्रत्येक जिल्ह्याचे स्वतंत्र दालन

अ‍ॅडव्हान्टेज विदर्भ यावर्षी प्रथमच होत आहे, यातून अभ्यास करुन काही सुधारणा पुढील वर्षी करण्यात येतील आणि त्यात प्रत्येक जिल्ह्याचे स्वतंत्र पॅव्हेलियन यात असेल. त्यातून त्या जिल्ह्याची माहिती, उपलब्धता आणि विकासाला असलेला वाव यांचे दर्शन होईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

हेही वाचा 

Back to top button