IAS Dr. Vipin Itankar : नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांना ‘बेस्ट इलेक्टोरल प्रॅक्टिसेस २०२३’ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान | पुढारी

IAS Dr. Vipin Itankar : नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांना 'बेस्ट इलेक्टोरल प्रॅक्टिसेस २०२३’ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : नागपुरचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते ‘बेस्ट इलेक्टोरल प्रॅक्टिसेस अवार्ड’ या राष्ट्रीय पुरस्काराने आज दिल्लीत सन्मानित करण्यात आले. भारत निवडणूक आयोगाच्या ‘मिशन युवा’ या अभियानांतर्गत नागपूर जिल्ह्यात अधिकाधिक नवमतदारांच्या नोंदणीसाठी प्रभावीरित्या राबवण्यात आलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर, छत्तीसगड राज्याला निवडणुका शांततेत पार पाडल्याबद्दल सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्य म्हणुन गौरविण्यात आले आहे.

राजधानी दिल्लीत १४ व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आज आयोजन करण्यात आले. निवडणूक आयोगाच्या विविध अभियानांमध्ये निवडणूक सुधारणा, मतदार शिक्षण, निवडणूक व्यवस्थापन, सुरक्षा नियोजन या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरीसाठी अधिकाऱ्यांना वर्ष २०२३ साठी सात भारतीय प्रशासकीय सेवेतील आणि भारतीय पोलिस सेवेतील अधिकाऱ्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या पुरस्कार वितरण कार्यक्रमात केंद्रीय कायदा मंत्री अर्जुनराम मेघवाल, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त अनूपचंद्र पांडे आणि अरुण गोयल उपस्थित होते. देशातील विविध भागांमध्ये निवडणूक मतदान प्रक्रियेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यांना, जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

बेस्ट इलेक्टोरल प्रॅक्टिसेस पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. इटनकर यांनी पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. यावेळी ते म्हणाले की, निवडणूक आयोगाद्वारे नागपूर येथे बेस्ट इलेक्टोरल प्रॅक्टिसेसमध्ये सुरू असलेला ‘मिशन युवा इन’ अभियान प्रभावीपणे राबवण्यात आले असून आठ महिन्यात ८८ हजार पेक्षा अधिक नव युवा मतदारांची नोंदणी करण्यात आली.

Back to top button