चंद्रपूर : काली माता मंदिरातील महाप्रसादातून १५० जणांना विषबाधा; एकाचा मृत्यू | पुढारी

चंद्रपूर : काली माता मंदिरातील महाप्रसादातून १५० जणांना विषबाधा; एकाचा मृत्यू

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : काली माता मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाच्या अन्नातून दीडशे जणांना विषबाधा झाली असून त्यातील एका  80 वर्षीय गुरुफेक शिवनाथ यादव व्यक्तीचा मृत्यू झाला. दीडशे जणांवर भद्रावती, वरोरा, माजरी ग्रामीण रूग्णालय, माजरी कॉलरी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहे. या प्रकरणात कार्यक्रमाचे आयोजक व स्वयंपाक तयार करणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
भद्रावती तालुक्यातील माजरी येथील माजरी येथील न्यू हाउसिंग एरिया, काली माता मंदिरात गुल्लूराम दर्शनराम यांचेकडून काल शनिवारी (दि. 13) सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादाच्या कार्यक्रमात माजरी,  माजरी कॉलरी, लगतच्या कॉलनीमधील शेकडों नागरिक सहभागी झाले होते. रात्री साडेदहावाजेपर्यंत महाप्रसादाचा लाभ नागरिकांनी घेतला. त्यानंतर आज रविवारी पहाटे पासून शेकडो नागरिकांना उलट्या, संडास व पोटदुखी सुरू त्रास जाणवायला लागला. त्यामुळे तात्काळ मिळेल त्या  साधनांनी बाधीत रूग्णांना माजरी, वरोरा व भद्रावती येथील आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले. पहाटेच्या सुमारास गुरुफेक शिवनाथ यादव (वय 80) वृद्धाचा मृत्यू झाला. तर सुमारे दीडशे रुग्णांना माजरी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय वरोरा व भद्रावती येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सदर घटनेची माहिती होताच वरोरा उपजिल्हा रुग्णालयात आमदार प्रतिभा धानोरकर यांनी भेट देऊन रुग्णांच्या प्रकृतीची परिस्थिती जाणून घेतली. उचार घेत असलेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
या रूग्णांना महाप्रसादातील भोजनातून विषबाधा झाली असावी असा प्राथमिक अंदाज आरोग्य विभागाने वर्तविला आहे. रविवारी सकाळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अशोक कराटे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर महादेव चिंचोले, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय आसुटकर, वरोरा येथील डॉक्टर खुजे आदींनी रुग्णांवर उपचार सुरू असलेल्या रूग्णालया भेट घेतली. घटनेची माहिती जाणून घेतली.  अन्न व पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.

Back to top button