

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक जिल्ह्यातील शेतीपिके दुष्काळाच्या झाळांनी संकटात सापडलेली असतानाच आता पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर होण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यातील दहा तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाल्याने पावसाच्या खंडाचा परिणाम खरीप पिकांवर झाला आहे. परिणामी, आगामी काळात हिरवा तसेच कोरडा चारा उपलब्ध होण्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
प्रशासनाच्या आकडेवारीनुसार, ऑगस्टअखेर उपलब्ध असलेला चारासाठा पुढील दोन ते तीन महिनेच पुरणार आहे. त्यामुळे जानेवारीत चाऱ्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता असून, २०२७ च्या उन्हाळ्यात तीव्र चारा संकटाला सामोरे जाण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात सध्या सुमारे १७ लाख ४६ हजार ३७३ पशुधन आहे. त्यामध्ये ७ लाख २८ हजार ८७ गायी, १ लाख ५६ हजार ४५० म्हशी, १ लाख ११ हजार ५५१ वासरे, ५ लाख १७ हजार ५६९ शेळ्या आणि २ लाख ४७ हजार १७८ मेंढ्यांचा समावेश आहे. या पशुधनासाठी दररोज सुमारे ६ हजार ४०६ मेट्रिक टन चाऱ्याची आवश्यकता भासते. याशिवाय पशुधनासाठी दररोज सुमारे ३६ कोटी ८८ लाख ४ हजार लिटर पाण्याची गरज आहे.
तुलनेत खरीप हंगामातून सुमारे १५ लाख ४४ हजार ६०५ किलो, २०२५ च्या रब्बी हंगामातून २५ लाख ४ हजार २८४ किलो, तर २०२६ च्या उन्हाळी हंगामातूनही काही प्रमाणात चारा उपलब्ध झाला असून, ऑगस्टअखेर जिल्ह्यात ८ लाख ७६ हजार १८४ मेट्रिक टन चारा उपलब्ध होता.
यात रोजची ६ हजार ४०६ मेट्रिक टन गरज लक्षात घेतल्यास हा साठा सुमारे तीन महिन्यांपेक्षा थोडा अधिक काळ पुरू शकतो. त्यात सप्टेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात चारा वापरला गेला आहे. त्यामुळे सध्याचा साठा संपण्यापूर्वीच नवीन चारा उपलब्ध करून देण्याचे नियोजन प्रशासनाला करावे लागणार आहे.
दुष्काळी तालुक्यांत दुहेरी संकट:
दुष्काळामुळे आधीच खरीप पिकांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. पिकांचे अवशेष आणि शेतातील उपलब्ध चारा यावर पशुपालक मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतात. मात्र, पावसाचा खंड आणि पिकांचे नुकसान कायम राहिल्यास आगामी काळात चाऱ्याची उपलब्धता आणखी घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाण्याच्या टंचाईबरोबरच पशुधनाच्या चाऱ्याचे नियोजन प्रशासनासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
चारा नियोजनाची आवश्यकता:
जिल्ह्यातील नांदगाव, येवला, सिन्नर यांसारख्या काही तालुक्यांमध्ये परिस्थिती आणखी चिंताजनक आहे. नांदगाव तालुक्यात १ लाख ८२ हजार ४२४ पशुधन असून, त्यासाठी दररोज सुमारे ४९८ मेट्रिक टन चाऱ्याची आवश्यकता आहे. तर सिन्नर तालुक्यात १ लाख ५४ हजार ५२६ पशुधन असून, दररोज सुमारे ६३७ मेट्रिक टन चारा आवश्यक आहे. येवला तालुक्यातही तुलनेत चाऱ्याची उपलब्धता अत्यंत कमी प्रमाणात असून, या तालुक्यांसह नाशिक जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी तत्काळ चाऱ्याचे नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे.