Nashik infant baby dead body bike transport : दुचाकीवरून ६० किमी नेला बाळाचा मृतदेह! निर्दयी यंत्रणा

जिल्हा शासकीय रुग्णालयाने शववाहिनी नाकारल्याचा दावा
Nashik
Nashik infant baby dead body bike transport
Published on: 
Updated on: 

त्र्यंबकेश्वर : शासकीय रुग्णालयात मृत्यू झाल्यास मृतदेह घरी नेण्यासाठी नियमांनुसार मोफत शववाहिनी देण्याची तरतूद आहे. मात्र, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके देवगाव येथील बाळाचा मृत्यू झालेल्या दुर्दैवी माता-पित्यांना दुचाकीवरून त्याचा मृतदेह पोटाशी धरून सुमारे ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या गावी जाण्याची वेळ आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके देवगावपैकी बड्र्याची वाडी येथील संगीता राहुल मेंगाळ ही गर्भवती महिला गुरुवारी (दि. १) नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झाली होती. शुक्रवारच्या पहाटे रात्री २ वाजता ती प्रसूत होऊन तिने बाळाला जन्म दिला. त्यानंतर उपचार सुरू असतानाच सकाळी ११ वाजता या नवजात बाळाचा मृत्यू झाला. मृत बाळाला अंत्यविधीसाठी घरी घेऊन जाण्याची व त्यासाठी वाहन उपलब्ध करून देण्याची मागणी माता-पित्यांनी रुग्णालयात केली. मात्र, त्यांना नकार देतानाच वाहन देता येत नाही, असे उत्तर देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

Nashik
Nashik Municipal Corporation | नाशिककरांना मोठा दिलासा! मालमत्ता अन् पाणीपट्टी नाव बदलाच्या विलंब शुल्काला महापालिकेचा 'ब्रेक'

त्यातच खासगी रुग्णवाहिका अथवा चारचाकी वाहनासाठी या माता-पित्याकडे पैसे नसल्याने अखेर त्यांनी दुचाकीवरून बाळाचा मृतदेह घेत नाशिक जिल्हा रुग्णालय ते टाके देवगाव असा सुमारे ६० कि.मी. अंतर प्रवास केला. यामुळे नुकतीच बाळंत असलेल्या मातेचीही प्रकृती बिघडली आहे. आता या मातेला नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

'जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम' कागदावरच

भारत सरकारच्या 'जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम' अंतर्गत १ वर्षापर्यंतच्या आजारी बालकांना शासकीय रुग्णालयात मोफत उपचार आणि घरून रुग्णालयात व रुग्णालयातून घरी जाण्यासाठी मोफत वाहतूक दिली जाते. या दरम्यान बालकाचा मृत्यू झाल्यास, मृतदेह सन्मानाने घरी पोहोचवण्यासाठी रुग्णालयाने मोफत व्यवस्था करणे बंधनकारक आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्हा रुग्णालय किंवा उपजिल्हा रुग्णालयात विशेष रुग्णवाहिका उपलब्ध असते. मात्र, या माता-पित्याला ही सुविधा न मिळाल्याचा आरोप या माता-पित्याने केला आहे.

एल्गार कष्टकरी संघटनेने माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेचा निषेध करत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. त्र्यंबकेश्वर येथील उपजिल्हा रुग्णालय स्थलांतरित झाल्याने तालुक्यातील सुमारे दोन लाख नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप एल्गार कष्टकरी संघटनेने केला आहे.

Nashik
Devi Idol Price Rise | यंदा नवरात्रोत्सवात देवीच्या मूर्ती महागल्या! कच्चा माल अन् मजुरी वाढल्याने 25 ते 30 टक्क्यांनी दरांत वाढ

अन्यथा आंदोलन

सर्वसामान्यांच्या सुविधा नाकारणाऱ्या या घटनेची चौकशी करून संबंधित अधिकारी-कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल.

- भगवान मधे, अध्यक्ष, एल्गार कष्टकरी संघटना

माहिती घेतो...

मृतदेह वाहण्यासाठी आपण शववाहिका उपलब्ध करून देत नाहीत. मात्र, डिलिव्हरी झालेल्या महिलेसाठी आपण रुग्णवाहिका उपलब्ध करून देत असतो. ती महिला दुचाकीवर का गेली, कोणाच्या परवानगीने गेली याबाबतची माहिती घेतो.

- सतीश शिंपी, जिल्हा शल्यचिकित्सक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news