गडचिरोली : पोर्ला वनपरिक्षेत्रात वाघाचा मृत्यू - पुढारी

गडचिरोली : पोर्ला वनपरिक्षेत्रात वाघाचा मृत्यू

गडचिरोली ; पुढारी वृत्‍तसेवा

वडसा वनविभागांतर्गत पोर्ला वनपरिक्षेत्रातील काटली गावाच्या तलावाजावळ वाघाचा मृत्यू झाल्याची घटना काल (बुधवार) संध्याकाळी उघडकीस आली. दोन वाघांच्या झुंजीत एका वाघाचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वनाधिकाऱ्यांनी वर्तविला आहे.

मृत वाघ ३ ते ४ वर्षे वयाचा असून, नर होता. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे व अन्य अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या नियमानुसार घटनास्थळाच्या पाचशे मीटर परिसराची पाहणी करण्यात आली.

आज सकाळी मृत वाघाच्या मौका स्थळी पंचनामा करण्यात आला. त्यानंतर डॉ. रविकांत खोब्रागडे, डॉ.व्ही.एस.लेखामी, डॉ. बी.आर.रामटेके यांच्या चमूने मृत वाघाचे शवविच्छेदन केले. यावेळी वाघाच्या मानेवर व पायाला दुसऱ्या वाघाने चावा घेतल्याच्या जखमा दिसून आल्या. यावरुन वाघाचा मृत्यू दोन वाघांच्या झुंजीत झाला असावा, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Back to top button