‘मोदी तुम्हाला पाकिस्तानात सुरक्षित वाटते पण तुमच्याच देशातील पंजाबचा तिरस्कार का करता?’ | पुढारी

'मोदी तुम्हाला पाकिस्तानात सुरक्षित वाटते पण तुमच्याच देशातील पंजाबचा तिरस्कार का करता?'

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा

पंजाबमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटीमुळे पंजाब आणि पंजाबमधील लोकांचा अपमान झाला असून, जगभरात देशाची प्रतिमा मलिन झाली आहे, असा आरोप काँग्रेसने गुरुवारी केला. एका षड्यंत्राखाली पंजाबची संस्कृती चिरडली जात असल्याचा दावा काँग्रेसने केला. पंतप्रधानांना पाकिस्तानात सुरक्षित वाटते पण ते त्यांच्याच देशात असुरक्षित आहेत का, असा सवाल काँग्रेसने केला.

पत्रकार परिषदेला संबोधित करताना काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा म्हणाले की, गेल्या २४ तासांपासून निर्माण होत असलेल्या वादामुळे देशाची प्रतिमा मलीन होत आहे. पंजाबची संस्कृती एका षड्यंत्राखाली चिरडली जात आहे. पंतप्रधानांवर निशाणा साधत त्यांनी विचारले की, तुम्हाला पाकिस्तानात सुरक्षित वाटते, पण तुमच्याच देशातील पंजाब या राज्याचा तुम्ही तिरस्कार का करता, तुम्ही जिवंत परतलात, असा शब्द वापरता?

खेडा म्हणाले की, शेतकरी काही मागण्या करत आहेत. गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांना हटवावे, आंदोलनात प्राण गमावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई द्यावी आणि किमान आधारभूत किमतीचा कायदा व्हावा, अशी त्यांची इच्छा आहे. तुम्ही शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे.

निवडणुका जिंकण्यासाठी असे द्वेषपूर्ण राजकारण करू नये

यापूर्वी पंतप्रधान मोदी वाराणसी, दिल्लीचे पहाडगंज आणि नोएडा येथेही ट्रॅफिक जॅममध्ये अडकले होते, परंतु त्यावेळी सुरक्षेतील त्रुटींबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचा दावा त्यांनी केला. केवळ निवडणुका जिंकण्यासाठी असे द्वेषपूर्ण राजकारण करू नये, असे ते म्हणाले.

काँग्रेस प्रवक्त्याने आरोप केला की, “पंतप्रधानांनी पंजाब, पंजाबची जनता आणि पंजाबियतचा अपमान केला आहे. पंजाबला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला आहे. पंतप्रधानांनी दीर्घायुष्य जगावे, निरोगी राहावे, अशी आपली सर्वांची इच्छा आहे, पण पंजाबच्या लोकांची बदनामी करू नका.

दुसरीकडे काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी म्हणाले की, या प्रकरणात कोणतेही राजकारण होऊ नये आणि या संपूर्ण प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्यात यावी जेणेकरून खरे तथ्य बाहेर येईल.

हे ही वाचलं का ?

Back to top button