नागपूर: दिघोरीत फुटपाथवर झोपणाऱ्यांना कारने चिरडले; दोघांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी 

नागपूर  हिट अँड रन
नागपूर हिट अँड रन

नागपूर, पुढारी वृत्तसेवा:  पुण्यातील भीषण अपघातानंतर राज्यात अपघातांच्या घटना वाढल्याचे दिसत आहे. उपराजधानीतही हिट अँड रन प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. शनिवारी नंदनवन, रविवारी कामठीत झालेल्या अपघातानंतर सोमवारी मध्यरात्री वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिघोरी चौकाजवळ आणखी एक भीषण अपघात घडला. वाढदिवसाची पार्टी करून येणाऱ्या तरुणांच्या एका वेगवान कारने फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना चिरडले. त्यात दोघांचा मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी आहेत. दिवसा खेळणी विकून रात्री ही मंडळी नेहमीप्रमाणे फूटपाथवर झोपली होती. मध्यरात्री दीड ते दोनच्या सुमारास हा अपघात घडला.

सीसीटीव्हीच्या माध्यमातून लगेच शोधमोहीम

वाठोडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय दिघे यांनी दिलेल्या माहितीनुसार, भूषण लांजेवार असे आरोपी कारचालकाचे नाव असून त्याला तातडीने अटक करण्यात आली. तो मद्यधुंद अवस्थेत भरधाव कार चालवत होता. या घटनेची माहिती मिळताच वाठोडा पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. सर्व जखमींना उपचारासाठी मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून फरार झाला होता. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून लगेच शोधमोहीम हाती घेत कारचालकास अटक केली.

एका महिलेचा घटनास्थळीच मृत्यू

हा अपघात घडला तेव्हा फुटपाथवर काही लोक झोपले होते. हे लोक रस्त्यावर खेळणी विकून उदरनिर्वाह करणारे  होते व त्यात महिला-मुलांचादेखील समावेश होता. उमरेड मार्गाकडे जाणाऱ्या भरधाव कारच्या चालकाचे नियंत्रण सुटले व कार थेट फुटपाथवर चढली. कार तीन महिला, चार मुले व एका पुरुषाच्या अंगावरच गेली. यामुळे जोरदार आवाज झाला व एका महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर दुसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.या घटनेनमुळे परिसरात खळबळ उडाली.

अपघातानंतरही त्याने जणू काही घडलेच नाही या अविर्भावात कार रिव्हर्स घेतली आणि जखमी पुन्हा चिरडले गेले, हे युवक कार घेऊन पळून गेले. मात्र सीसीटीव्हीत हा सर्व अपघात कैद झाल्याने पोलिसांनी कारचालक भूषण लांजेवारला (एमएच 46 एक्स 8498) कारसह अटक केली.

वाढदिवसाची पार्टी करून  मद्यधुंद तरुण गाडी चालवत होते.

वाढदिवसाची पार्टी करून येणाऱ्या मद्यधुंद तरुणांच्या एका वेगवान कारने फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना चिरडले. दोघांचा मृत्यू झाला तर बालकासह 7 जण गंभीर जखमी आहेत. कांतीबाई गजोड बागडीया (42), सीताराम बाबूलाल बागडीया (37) अशी मृतकांची नावे आहेत. वंश झाडे या तरुणाच्या वाढदिवस पार्टीच्या निमित्ताने भूषण लांजेवार, सौरभ कडुकर,सनमय पत्रेकर,अथर्व बाणाईत,अथर्व मोगरे,ऋषिकेश चौबे हे सात मित्र ढाब्यावरून घरी परतत असताना हा भीषण अपघात घडला.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news