Navegaon-Nagzira : वाघिणीच्या गळ्यातून जीपीएस कॉलर निघाले; वाघिणीचा शोध सुरू: वन्यजीव विभागात खळबळ | पुढारी

Navegaon-Nagzira : वाघिणीच्या गळ्यातून जीपीएस कॉलर निघाले; वाघिणीचा शोध सुरू: वन्यजीव विभागात खळबळ

भंडारा: पुढारी वृत्तसेवा : तीन दिवसांपूर्वी ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात सोडलेल्या वाघिणीच्या गळ्यातून सॅटेलाईट जीपीएस कॉलर निघाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर वन्यजीव विभागाकडून सदर वाघिणीचा शोध सुरू आहे. हे कॉलर कसे निघाले, यावर आता विचारमंथन सुरू आहे. Navegaon-Nagzira

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वाघाचे संवर्धन स्थानांतरण उपक्रमाअंतर्गत दुसऱ्या टप्प्यात सुरू आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघीण (एनटी ३) ११ एप्रिलरोजी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातील नागझिरा अभयारण्याचे कक्ष क्रमांक ९५ मध्ये निसर्गमुक्त करण्यात आले होते. निसर्गमुक्त केलेल्या वाघिणीच्या हालचालींवर सॅटेलाईट जीपीएस कॉलर तसेच व्हीएचएफ अँटिना मार्फत क्षेत्रीयस्तरावर प्रशिक्षित चमूव्दारे २४/७ सक्रियपणे सनियंत्रण सुरू होते. Navegaon-Nagzira

१२ एप्रिलपासून मादी वाघिणीचे सॅटेलाईट जीपीएस कॉलरचे सिग्नल तसेच व्हीएचएफ चमूला प्राप्त सिग्नल एकाच ठिकाणी येऊ लागले.  त्यामुळे १३ एप्रिलरोजी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील व्हीएचएफ चमू, क्षेत्रीय अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून शोधमोहीम राबविली. यावेळी मादी वाघिणीचे सॅटेलाईट जीपीएस कॉलर नागझिरा अभयरण्यातील कक्ष क्रमांक ९५ मध्ये जमिनीवर पडलेले आढळले. शोधमोहीम राबवून परिसरात कोणतीही अनुचित घटना घडल्याचे निदर्शनास आले नाही. क्षेत्रीय चमूला आढळलेले सॅटेलाईट जीपीएस कॉलर चालू स्थितीमध्ये आहे.  वाघिणीकडून सॅटेलाईट जीपीएस कॉलर स्वत:हून काढण्यात आल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

वाघिणीचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ अधिकारी तसेच तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील व्हीएचएफ चमू व क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून शोधमोहीम राबविण्यात येत आहे. तसेच संपूर्ण क्षेत्रात अतिरिक्त ट्रॅप कॅमेरा लावून वाघिणीच्या हालचालीचे सनियंत्रण करण्याची कारवाई सुरू आहे. वाघिणीला पुन्हा सॅटेलाईट जीपीएस कॉलर लावण्याकरीता क्षेत्रीय स्तरावर प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याच्या प्रतिक्रिया वन्यप्रेमींमधून उमटत आहेत. आता या वाघिणीचा शोध घेऊन तिला पुन्हा कॉलर लावावे लागणार आहे.

हेही वाचा 

Back to top button