MLA Raju Parwe resign : विदर्भात काँग्रेसला धक्का: आमदार राजू पारवे यांचा शिंदे गटात प्रवेश | पुढारी

MLA Raju Parwe resign : विदर्भात काँग्रेसला धक्का: आमदार राजू पारवे यांचा शिंदे गटात प्रवेश

राजेंद्र उट्टलवार

नागपूर:  काँग्रेस आमदार राजू पारवे यांनी काँग्रेसचा आणि आपल्या आमदार पदाचा आज (दि.२४) राजीनामा दिला. त्यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. पारवे यांना रामटेक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात येणार आहे, असे सूत्रांकडून सांगितले जात आहे.
दरम्यान, पारवे यांनी आपल्या राजीनाम्याचे पत्र विधानसभा अध्यक्ष राहुल नॉर्वेकर यांना दिले आहे. MLA Raju Parwe resign

अखेर उमेदवार काँग्रेसचा, चिन्ह शिवसेनेचे आणि प्रचाराची जबाबदारी भाजपची हे अशक्य वाटणारे समीकरण नागपूर जिल्ह्यात रामटेक मतदारसंघात प्रत्यक्षात आले आहे. लोकसभा निवडणुकीचे नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच काँग्रेसला नागपूर जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. उमरेडचे काँग्रेस आमदार राजू पारवे यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्षाकडे सोपविला असून रविवारी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. MLA Raju Parwe resign

काँग्रेसचे आमदार राजू पारवे आता रामटेक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत. गेले काही दिवस त्यांच्या उमेदवारीवरून महायुतीत घमासान सुरू होते. सुरुवातीला भाजपने या मतदारसंघावर दावा ठोकला, प्रचार सुरू केला. नंतर शिवसेनेने हा मतदारसंघ ठेवावा, पण जनतेत नाराजी असल्याने शिवसेनेचे विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांच्याऐवजी दुसरा उमेदवार द्या, अशी मागणी भाजपने पुढे केली.

संबंधित बातम्या

दरम्यान,आ राजू पारवे यांना तिकीट देण्यावरून शिंदे गटात तसेच भाजपमध्येही अंतर्गत धुसफूस सुरू झाली. राजू पारवे यांच्या उमेदवारीनंतर ही बंडाळी अधिकच वाढण्याची चिन्हे आहेत. मध्यंतरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर आ. पारवे चर्चेत आले. आज रामटेकसाठी काँग्रेसचे आ. राजू पारवे यांना शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित होताच आ. राजू पारवे यांनी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेनेत मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश घेतला. यावेळी खा. कृपाल तुमाने,  अॅड. आशिष जैस्वाल, पूर्व विदर्भ संघटक किरण पांडव प्रामुख्याने उपस्थित होते.

विशेष म्हणजे नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदारसंघावरून दोन्हीकडे नाराजी आहे. शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने गेले दोन टर्म या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. शिंदे गटाने पक्षांतर्गत उठाव केला. त्यावेळी जे 13 खासदार शिंदे यांच्यासोबत गेलेत त्यामध्ये कृपाल तुमाने यांचा प्राधान्याने समावेश होता. आपल्या सर्व खासदारांना तिकीट मिळणारच, कामाला लागा, असे आश्वासन दिल्याने तुमाने निश्चित होते.  मात्र, भाजपने या मतदारसंघात उघडपणे दावेदारी करीत जनसंपर्क अभियान सुरू केले. भाजपकडे माजी आमदार सुधीर पारवे, माजी जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांची नावे प्रबळ दावेदार असताना भाजपने काँग्रेसचे उमरेडचे आमदार राजु पारवे यांना शिंदे गटातून उमेदवारी देत महायुतीच्या ताब्यात हा मतदारसंघ ठेवण्याचा अफलातून पवित्रा घेतल्यानंतर शिंदे गटात अंतर्गत धुसफूस वाढली.

तुमाने यांचे निकटवर्तीय आणि रामटेक लोकसभा जिल्हा संघटक अमोल गुजर यांनी असंख्य समर्थकांसह आपल्या पदाचा राजीनामा पक्ष प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठविला. खासदार कृपाल तुमाने यांना तिकीट न मिळाल्यास आपणही प्रबळ दावेदार आहोत, आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला. या मतदारसंघात शिवसेना वाढू नये, असा पक्षांतर्गतच काही लोकांचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला.

दरम्यान, आपल्यासोबत किमान 150 पदाधिकारी राजीनामा देण्याच्या पवित्र्यात असून पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी योग्य तो न्याय तातडीने करावा, पक्षाशी निष्ठावान असलेले खासदार कृपाल तुमाने यांना तिकीट द्यावे, इतर पक्षातील कुणालाही तिकीट देऊ नये, अशी मागणी आता शिवसेनेसोबतच भाजपातही सुरू झाली. आपल्या निष्ठवंतांचे काय ?असा प्रश्न भाजपातूनही पुढे केला जात आहे. अर्थातच आता या सर्व असंतुष्ठांना कामाला लावण्याचे आव्हान शिंदे गट आणि भाजपपुढे असणार आहे. माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांचा पराभव करीत हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात ठेवणाऱ्या, शिवसेनेतील उठाव होत असताना मुख्यमंत्री शिंदे यांची साथ देणाऱ्या खा. कृपाल तुमाने यांचे शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे आगामी पुनर्वसन कसे करणार हा देखील प्रश्न आता चर्चेत आहे.

दुसरीकडे काँग्रेसने या मतदारसंघात माजी जि. प. अध्यक्ष रश्मी बर्वे यांना उमेदवारी दिली आहे. एकंदरीत दोन्ही नवे चेहरे आणि काँग्रेसचेच उमेदवार आमने सामने उभे ठाकल्याने बर्वे यांच्या निमित्ताने माजी मंत्री सुनील केदार आणि महायुती उमेदवार म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची कसोटी या प्रतिष्ठित लढतीत लागणार आहे.

हेही वाचा 

Back to top button