Shivani Vadettivar On India Aghadi: चंद्रपुरात शिवानी वडेट्टीवारांच्या नावाला इंडिया आघाडीकडूनच विरोध | पुढारी

Shivani Vadettivar On India Aghadi: चंद्रपुरात शिवानी वडेट्टीवारांच्या नावाला इंडिया आघाडीकडूनच विरोध

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : चंद्रपुरात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे, मात्र चंद्रपुरात अद्यापही कोणत्याच पक्षाचा उमेदवार ठरलेला नाही. लोकसभेसाठी प्रतिभा धानोरकर यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्यावर अचानक विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी चंद्रपूर लोकसभेवर दावा केला आहे. आज (दि.११) चंद्रपुरात पार पडलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत शिवानी वड्डेटीवार यांच्या नावाला जोरदार विरोध करण्यात आला आहे. Shivani Vadettivar On India Aghadi

चंद्रपुरात उमेदवारीवरून  भाजपसहित काँग्रेस पक्षात संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.  लोकसभेसाठी प्रतिभा धानोरकर यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्यावर अचानक विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी दावा केला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष व घटक पक्षात संभ्रमाची स्थिती आहे. विशेष म्हणजे शिवानी यांनी सरळ दिल्ली गाठत पक्षातील वरिष्ठांना लोकसभा उमेदवारीसाठी विनंती केली आहे. तर चंद्रपुरातील शासकीय विश्रामगृहात इंडिया आघाडीतील घटक पक्षाच्या बैठकीत शिवानी  यांच्या  नावाला जोरदार विरोध करण्यात आला आहे. Shivani Vadettivar On India Aghadi

बैठकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट, आम आदमी पार्टी, संभाजी ब्रिगेड व समाजवादी पक्षाने संयुक्त बैठक घेवून चंद्रपूर लोकसभा ही काँग्रेस पक्षाच्या कोट्यात आहे, त्यामुळे पक्षाने लवकरात लवकर आपला उमेदवार जाहीर करावा, अशी मागणी केली. उमेदवार कसा जिंकणार त्यासाठी आम्ही सर्व पक्ष मिळून कामाला लागू, मात्र सध्या काँग्रेसमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. याकरिता पक्षाने चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील उमेदवार द्यावा, अश्या मागणीचे पत्र महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांना पाठविणार असल्याचे बैठकीत एकमत झाले.

राज्याचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी चंद्रपूर लोकसभेवर दावा केल्याने पक्षातील अंतर्गत कलह पुढे आला आहे, पुन्हा धानोरकर विरुद्ध वडेट्टीवार असा संघर्ष पक्षात सुरू झाला आहे. शिवानी वडेट्टीवार या गडचिरोली लोकसभा क्षेत्रात येतात, त्यामुळे इंडिया आघाडीतील घटक पक्षाने चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील उमेदवारांची मागणी केली आहे. महाविकास आघाडीमधील पक्षांनी लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली असून लवकरच सर्व घटक पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करणार असल्याची माहिती या बैठकीत दिली.

हेही वाचा 

Back to top button