Shivani Wadettiwar : चंद्रपूर लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या काँग्रेसच्या शिवानी वडेट्टीवार कोण आहेत ? | पुढारी

Shivani Wadettiwar : चंद्रपूर लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या काँग्रेसच्या शिवानी वडेट्टीवार कोण आहेत ?

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असताना सर्वच पक्षात इच्छुक उमेदवारांनी आपली दावेदारी ठेवायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातून राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्या आणि युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत मी काँग्रेस कार्यकर्ता म्हणून तिकीट मागितल्याचे त्या म्हणाल्या. दिल्ली दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. (Shivani Wadettiwar)
यावेळी बोलताना शिवानी वडेट्टीवार म्हणाल्या की, गेली सात- आठ वर्ष मी पक्ष संघटनेत काम करत आहे. युवक काँग्रेसच्या माध्यमातून अनेक महत्त्वाचे मुद्दे हाताळले आहेत. असे सांगतानाच युवकांनाही संधी मिळाली पाहिजे म्हणून आपण इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र पक्षाचा निर्णय हा अंतिम असेल असेही त्या म्हणाल्या. दिल्ली दौऱ्यावर असताना पक्षातील काही नेत्यांच्या त्यांनी भेटीही घेतल्या.
विजय वडेट्टीवार यांच्याबाबत होत असलेल्या चर्चांचे त्यांनी खंडन केले. विजय वडेट्टीवार यांचे मूळ काँग्रेस आहे त्यामुळे कोणतेही नेते कुठेही गेले तरी विजय वडेट्टीवार कॉंग्रेसमध्येच असतील. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत पक्ष सोडण्याचा प्रश्नच येत नसल्याचे त्या म्हणाल्या. काँग्रेसची लढाई ही भाजपच्या विचारसरणीच्या विरुद्ध असलेली लढाई आहे. असेही शिवानी वडेट्टीवार म्हणाल्या.
इलेक्टोरल बॉंडबद्दलच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे शिवानी वडेट्टीवार यांनी स्वागत केले. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय स्वागतार्ह असून या निर्णयाला कोणी विरोध केल्यास त्यांची मत स्पष्ट होतील, असेही त्या म्हणाल्या.

काय आहेत चंद्रपूर लोकसभेची समीकरणे?

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत हंसराज अहिर यांचा काँग्रेसच्या बाळू धानोरकरांनी पराभव केला होता. त्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातुन निवडून आलेली काँग्रेसची एकमेव जागा होती. दरम्यान, काही दिवसांपूर्वी बाळू धानोरकर यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर या ठिकाणी पोटनिवडणूक झाली नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून बाळू धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांचे नाव चर्चेत आहे. सोबतच विजय वडेट्टीवार, त्यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांचेही नाव चर्चेत आहे. तर भाजपकडून या ठिकाणी माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर किंवा महाराष्ट्र सरकारमधील मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मैदानात उतरवले जाऊ शकते.

Back to top button