अमरावतीमधील कमानीचा वाद चिघळला, पोलिसांवर दगडफेक | पुढारी

अमरावतीमधील कमानीचा वाद चिघळला, पोलिसांवर दगडफेक

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील पांढरी खानमपूर येथील कमानीचा वाद चिघळला आहे. गावातील प्रवेशद्वाराला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी गेल्या पाच दिवसापासून विभागीय आयुक्त कार्यालयावर गावातील आंबेडकरी समाजाचे ग्रामस्थ आंदोलनाला बसले होते. या दरम्यान आज (दि.११) काही आंदोलक आक्रमक होऊन त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. तसेच काहीजण विभागीय आयुक्त कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे पोलिसांनी जमावावर लाठी चार्ज करून अश्रूधूराच्या नळकांड्या फोडल्या. संतप्त जमावाने पोलिसांच्या वाहनांवर देखील दगडफेक केली. त्यामुळे पाच ते सात पोलीस कर्मचारी जखमी झाले. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यात येणाऱ्या पांढरी खानमपूर येथील प्रवेशद्वाराच्या कमानीचा मुद्दा गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे गावात दोन गट निर्माण झाले आहेत. ग्रामपंचायत ने ठराव मंजूर केल्यानंतर गावातीलच विरोधी गट आमच्यावर बहिष्कार टाकत आहे, असा आरोप करत २०० कुटुंबांनी गाव सोडले होते. त्यानंतर त्यांनी थेट मुंबईला जाण्याचा इशारा देऊन आधी विभागीय आयुक्त कार्यालयावर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. गुरुवारपासून विभागीय आयुक्त कार्यालयावर शांततेत आंदोलन सुरू होते.
दरम्यान, आज आंदोलक आक्रमक झाल्यामुळे आंदोलनाला हिंसक वळण लागले. आंदोलकांच्या जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी लाठी चार्ज व अश्रूधुराचा वापर केला. त्यामुळे आंदोलक आणखीच आक्रमक झाले. आणि त्यांनी दगडफेक केल्याने वातावरण आणखीच बिघडले. घटनास्थळी पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्यासह मोठ्या प्रमाणात पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला आहे. आता विभागीय आयुक्त कार्यालय परिसराला छावणीचे रूप आले असून परिस्थिती नियंत्रणात आहे. पोलिसांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची आंदोलकांसोबत चर्चा

शनिवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत देखील आंदोलकांची चर्चा झाली होती. यावेळी गावातील दोन्ही गट उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी प्रवेशद्वाराला शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महापुरुषाचे नाव देण्याची सूचना केली होती. मात्र, या बैठकीतही कुठलाच तोडगा निघाला नाही. यासह विभागीय आयुक्त निधी पांडे यांनी आंदोलकांना तोडगा काढण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी मागितला होता. त्यामुळे तोडगा निघेपर्यंत आम्ही विभागीय आयुक्त कार्यालयावरच शांततेच्या मार्गाने आंदोलन करू अशी भूमिका पांढरी येथील ग्रामस्थांनी घेतली होती. तेव्हापासून विभागीय आयुक्त कार्यालयावर आंदोलन सुरू होते. अखेर कुठलाच तोडगा न निघाल्याने आज आंदोलक आक्रमक झाले. यादरम्यान पोलिसांसोबत काही आंदोलकांचा वाद झाला. आणि त्यामुळेच हे आंदोलन चिघळले.

हेही वाचा 

Back to top button