गडचिरोली: दोन महिलांना ठार करणारी वाघीण अखेर जेरबंद | पुढारी

गडचिरोली: दोन महिलांना ठार करणारी वाघीण अखेर जेरबंद

गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा : अहेरी आणि मुलचेरा तालुक्यात धुमाकूळ घालून दोन महिलांना ठार करणाऱ्या वाघिणीला वनविभागाच्या चमूने गुरुवारी (दि.१८) रात्री जेरबंद केले. या वाघिणीचे वय अंदाजे अडीच वर्षे असल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले.

७ जानेवारीला या वाघिणीने चिंतलपेठ येथील सुषमा मंडल आणि १५ जानेवारीला कोडसापूर येथील रमाबाई मुंजमकर या महिलेस ठार केले होते. त्यानंतर एका गाईचाही फडशा पाडला होता. यामुळे अहेरी आणि मुलचेरा तालुक्यात वाघिणीची दहशत होती. त्यानंतर नागरिकांनी वनाधिकाऱ्यांना भेटून वाघिणीचा तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली होती.

अखेर १६ जानेवारीला ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे यांच्या नेतृत्वात जलद प्रतिसाद पथकास पाचारण करण्यात आले. दोन दिवस हुलकावणी दिल्यानंतर १८ जानेवारीला रात्री १० वाजताच्या सुमारास या वाघिणीला जेरबंद करण्यात यश आले. या चमूत शार्प शूटर अजय मराठे, दिपेश टेंभुर्णे, वसीम शेख, योगेश लाकडे, गुरुनानक ढोरे यांचा समावेश होता.

हेही वाचा 

Back to top button