गडचिरोली : ५ लाखांची लाच स्वीकारताना वनपरिक्षेत्राधिकाऱ्यास अटक | पुढारी

गडचिरोली : ५ लाखांची लाच स्वीकारताना वनपरिक्षेत्राधिकाऱ्यास अटक

गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा : वनक्षेत्रातील रस्त्याच्या कामासाठी अवैधरित्या गौणखनिज वाहतूक करताना जप्त केलेले ट्रॅक्टर सोडून देण्यासाठी तसेच दंड कमी करण्यासाठी संबंधित कंत्राटदाराकडून ५ लाखांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी (दि.४) रात्री अहेरी तालुक्यातील पेरमिली येथील वनपरिक्षेत्राधिकारी प्रमोद आनंदराव जेनेकर (वय ३८) यास रंगेहाथ पकडून अटक केली. (Gadchiroli News)

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारकर्त्या कंत्राटदारामार्फत पेरमिली वनपरिक्षेत्रांतर्गत तुमरगुडा ते कासमपल्ली रस्त्याचे काम सुरु होते. या कामासाठी कंत्राटदाराने ट्रॅक्टरद्वारे गौण खनिजाची वाहतूक केली. ही वाहतूक अवैध असल्याचे सांगत वनपरिक्षेत्राधिकारी प्रमोद जेनेकर याने ट्रॅक्टर पकडून ७२ लाख रुपयांचा दंड ठोठावला. हा दंड कमी करुन जप्त केलेले ट्रॅक्टर सोडून देण्यासाठी जेनेकर याने तक्रारकर्त्यास १० लाख रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती तो ५ लाख रुपये स्वीकारण्यास तयार झाला. परंतु, लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने कंत्राटदाराने गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. (Gadchiroli News)

त्याअनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी रात्री सापळा रचून वनपरिक्षेत्राधिकारी प्रमोद जेनेकर यास तक्रारकर्त्याकडून ५ लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडून अटक केली. यावेळी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी जेनेकर याच्या निवासस्थानाची झडती घेऊन ८५ हजारांची रोख रक्कमही जप्त केली.

एसीबीचे पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर, अपर पोलीस अधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अनामिका मिर्झापुरे, पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले, सहायक फौजदार सुनील पेद्दीवार, पोलीस नाईक किशोर जौंजाळकर, संदीप घोरमोडे, संदीप उडाण, नरेश कस्तुरवार आदींनी ही कारवाई केली.

हेही वाचा 

Back to top button