ताडोबा मध्ये शहीद झालेल्या महिला वनरक्षकावर अंत्यसंस्कार | पुढारी

ताडोबा मध्ये शहीद झालेल्या महिला वनरक्षकावर अंत्यसंस्कार

चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा

ताडोबा व्याघ्र अभयारण्यात कर्तव्यावर असताना माया वाघिणीच्या हल्ल्यात बळी ठरलेल्या महिला वनरक्षक स्वाती ढोमणे यांच्या पार्थिवावर आज शनिवारी ( दि. २०) सायंकाळी पाचच्या सुमारास चिमूर येथे अंत्यसंस्कार पार पडले. तत्पूर्वी वनपरिक्षेत्र कार्यालयात त्यांच्या पार्थिवाला वनविभागाच्या वतीने मानवंदना देण्यात आली.

व्याघ्र पर्यटनासाठी जगप्रसिद्ध असलेल्या चंद्रपुरातील ताडोबा व्याघ्र अभयारण्यात कोलारा गेट मधील कोअर झोन मध्ये मागील वर्षभरापासून महिला वनरक्षक स्वाती नानाजी ढोमणे यांची सेवा नियमित सुरू होती. तत्पूर्वी त्या गडचांदूर येथे कार्यरत होत्या. शनिवार पासून ताडोबा अभयारण्यात वन्यप्राण्यांच्या गणनेला सुरुवात झाली आहे. २६ नोव्हेंबर पर्यंत ही गणना चालणार असून अभयारण्यातील वन्य प्राण्यांची संख्या वन विभागाला मोजता येणार आहे. गणनेचा एक भाग म्हणून ताडोबातील विविध पाणवठ्यावर ट्रांजिस्टर लाईन टाकून प्रक्रियेला गती देण्यात आली आहे.

शनिवार पासून सुरू झालेल्या गणनेकरीता महिला वनरक्षक स्वाती ढोमणे यांना पती प्रदीप सोनकांबळे यांनी कोलारा गेटवर सकाळी आणून सोडले. काही वेळाने त्यांना पत्नीला वाघाने पकडल्याची बातमी मिळाली. ते लगेच घटनास्थळाकडे रवाना झाले. कोलारा गेट जवळील पाणवटा ९७ कडे त्या तीन चौकीदारांसह पायीच निघाल्या होत्या. त्याच परिसरात भ्रमंती करीत असलेल्या माया वाघिणीचे वास्तव्य समोरच आढळून आले. तर त्याच समोर पर्यटन वाहनही पर्यटकांना घेऊन फिरत होते. आडोशाचा आश्रय घेत माया वाघिणीने त्या महिला वनरक्षकावर हल्ला करून बळी घेतला. त्या वाघिणीच्या थरारक प्रसंगाने वन चौकीदार घाबरून इतरत्र पळाले. लगेच या घटनेची माहिती वरिष्ठ वनाधिकाऱ्यांना देण्यात आली. ताडोबातील घनदाट जंगलात झाडाझुडपात काही अंतरावर मृतदेह मिळाला. वनाधिका-यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करून शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आला.

शनिवारीच सायंकाळी पाचच्या सुमारास चिमूर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन पार पडल्यानंतर पार्थिव वनपरिक्षेत्र कार्यालयात आणण्यात आले. यावेळी ताडोबाचे क्षेत्र संचालक नितीन नायगावकर, उपसंचालक काळे, ताडोबा बफर झोनचे उपसंचालक गुरुप्रसाद, एसीएफ येडे अभिजित वायकोस, वनपरिक्षेत्राधिकारी धानकुठे, शेंडे आदींच्या उपस्थितीत स्वाती ढोमणे यांच्या पार्थिवाला मानवंदना देण्यात आली. त्यानंतर चिमूर येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

स्वाती ढोमणे ह्या मुळच्या आल्लापल्ली येथील आहेत. त्यांचे वडिलही वनसेवेत असल्याचे समजते. ताडोबात येण्यापूर्वी त्या गडचांदूर येथे कार्यरत होत्या. वर्षभरापासून त्या ताडोबात कोलारा गेट मधील कोअर झोन मध्ये सेवेवर कार्यरत होत्या. सध्या त्यांचे वास्तव्य चिमूर येथील वडाळा परिसरात भाड्याच्या घरात रहात होते. त्यांचे पश्चात आई वडील, पती व चार वर्षाची आरूषी नावाची मुलगी आहे.

ताडोबाची राणी असलेल्या माया वाघिणीच्या हल्लात महिला वनरक्षक स्वाती ढोमणे हिचा बळी गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

६ लाख ६० हजाराची तातडीची आर्थिक मदत

सेवेवर असताना वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या स्वाती ढोमणे यांच्या कुटुंबियांना अंत्यसंस्काराकरिता वन विभागाने तातडीने ५० हजाराची मदत अदा केली. त्यानंतर ताडोबा फाऊंडेशनच्या वतीने ५ लाख रुपये, डब्ल्यूएफएफ या संस्थेच्या वतीने १ लाख रुपये तसेच वन कर्मचारी संस्थेच्या वतीने १० हजार रुपये अशी ६ लाख ६० हजार रुपयांची आर्थिक मदत प्रदान करण्यात आली आहे.

वन शहीदाचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करणार

ताडोबा अभयारण्यात वाघिणीच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या स्वाती ढोमणे यांना वन शहीदाचा दर्जा मिळण्यासाठी वन विभागाच्या वतीने प्रयत्न करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव वन विभागाला सादर करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लवकरच वनरक्षक स्वाती ढोमणे यांना वन शहीदाचा याचा दर्जा देण्यासाठी सादर करण्यात आलेल्या प्रस्तावावर निर्णय घेतला जाण्याची शक्यता वन अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. देशाची सुरक्षा करणाऱ्या सैनिकांप्रमाणे वनाधिकारी हे जंगलात वास्तव्यास असलेल्या वन्यप्राण्यांची सुरक्षा करतात. मात्र अशावेळी जंगलात वन्यप्राण्यांकडून वन अधिकाऱ्यांना धोका निर्माण होत असेल किंबहुना मृत्यू सारख्या घटना घडत असतील तर त्यांना वन शहीद म्हणून दर्जा देण्याची मागणी या घटनेने पुढे आली आहे.

Back to top button