Police Recruitment : पोलीस भरतीमध्ये बनावट प्रमाणपत्र जोडणाऱ्या पाच जणांना अटक | पुढारी

Police Recruitment : पोलीस भरतीमध्ये बनावट प्रमाणपत्र जोडणाऱ्या पाच जणांना अटक

गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या पोलीस भरती प्रक्रियेत प्रकल्पग्रस्त असल्याचे बनावट प्रमाणपत्र जोडून नोकरी बळकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच युवकांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. हे आरोपी गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

यंदा एप्रिल महिन्यात पोलीस विभागाने पोलीस भरतीची प्रक्रिया पूर्ण केली. यामध्ये पात्र उमेदवारांची निवड करण्यात आली. परंतु काही जणांनी बीड जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त असल्याचे बनावट प्रमाणपत्र जोडल्याची गोपनीय तक्रार पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्याकडे केली होती. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी व उपनिरीक्षक दीपक कुंभारे यांच्या नेतृत्वात दोन तपास पथके तयार करण्यात आली. यावेळी मागील पोलीस भरतीत प्रकल्पग्रस्त असल्याचे प्रमाणपत्र सादर करून शिपाई म्हणून नियुक्त झालेल्या ५ पैकी २ जणांचे, तर यंदाच्या भरतीत तात्पुरती नियुक्ती झालेल्या ४ उमेदवारांचे प्रमाणपत्र बोगस असल्याचे तपास पथकाच्या निदर्शनास आले. शिवाय निवड झालेल्या उमेदवारांची बीड जिल्ह्यात कुठलीही स्थावर मालमत्ता नसताना आणि ती शासनाने कुठल्याही प्रकल्पासाठी संपादित केली नसताना संबंधित उमेदवारांनी प्रकल्पग्रस्त असल्याचे बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचे निष्पन्न झाले.

त्यामुळे पोलिसांनी पाच युवकांना अटक केली, तर एक जण फरार आहे. या भरतीत आणखी काही उमेदवारांनी बनावट प्रमाणपत्र जोडले असण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, पोलूस त्या दिशेने तपास करीत आहेत.

ही कारवाई पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी, उपनिरीक्षक दीपक कुंभारे, राहुल आव्हाड, पुरुषोत्तम वाडगुरे, नरेश सहारा, हेमंत गेडाम, सतीश कत्तीवार, राकेश सोनटक्के, दीपक लेनगुरे, अकबर पोयाम, शुक्रचारी गव ई, माणिक दुधबळे, सुनील पुठ्ठावार, मंगेश राऊत, सचिन घुबडे, श्रीकांत बोईना, श्रीकृष्ण परचाके, सुरेश वट्टी, प्रशांत गरफडे, पंकज भगत, लीला सिडाम, शेवंता दाजगाये, पुष्पा कन्नाके, सोनम जांभुळकर, शगीर शेख, मनोहर दोगरवार यांनी केली.

Back to top button