नागपूर : क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम जगण्याला नवी दिशा देतात – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | पुढारी

नागपूर : क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम जगण्याला नवी दिशा देतात - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम जगण्याला नवी दिशा देण्याचे काम करतात, अधिकारी, कर्मचारी यांना समाजोपयोगी काम करताना त्याचा नक्कीच लाभ होतो असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मानकापूर विभागीय क्रीडा संकुल येथे सुरू असलेल्या नागपूर विभागीय क्रीडा व संस्कृतिक स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी  ते बोलत होते. कार्यक्रमाला विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर (भंडारा), जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे (गोंदीया) व वरिष्ठ महसूल अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री म्हणाले, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमातून प्रावीण्य दाखवण्याची संधी मिळते. महसूल विभागात सुरू असलेल्या ई-ऑफीस, ई-पंचनामा यासारख्या डिजिटल क्रांतीमुळे शासकीय कामात पारदर्शता, गतिशिलता व लोकाभिमुखता येईल. उत्तम कार्यालय व पायाभूत सुविधा असल्यास काम अधिक चांगले करता येते, म्हणून नागपूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयाची नवीन वास्तू लवकरच तयार करण्यात येणार आहे. तसेच भंडाराचे जिल्हाधिकारी कार्यालय देखील अद्यावत करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला असे स्पष्ट केले.
महसूल आणि गृह विभागाने चांगले काम केले तर शासनाची चांगली प्रतिमा निर्माण होते. राज्यात हे दोन्ही विभाग चांगले काम करत असल्याचेही ते म्हणाले.

महसूल कर्मचाऱ्यांच्या समस्या व मागण्यांवर शासन सकारात्मकतेने निर्णय घेत असल्याचे त्यांनी सांगितले. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी प्रास्ताविकातून महसूल विभागाद्वारे सेवा पंधरवाड्यानिमित्त विभागात 13 लाख अर्ज निकाली काढण्यात आले असल्याचे सांगितले. अतिवृष्टीग्रस्तांना दिवाळीपूर्वी कोटयवधी मदतनिधीचे वाटप, तसेच ई-ऑफीस प्रणाली सुरू करून तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्यात आली असल्याचे सांगितले. लवकरच ई-पंचनामा प्रणालीत सॅटेलाईटचा डाटा थेट मिळवून व नागरिकांना स्वत:च पंचनामा अपलोड करता येईल अशी प्रणाली विकसित करून कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे सांगितले.

हेही वाचलंत का?

Back to top button