कोल्हापूर: हसन मुश्रीफांची बदनामी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा; समर्थकांचा मुरगूड पोलीस ठाण्यासमोर ठिय्या | पुढारी

कोल्हापूर: हसन मुश्रीफांची बदनामी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा; समर्थकांचा मुरगूड पोलीस ठाण्यासमोर ठिय्या

मुदाळतिट्टा; पुढारी वृत्तसेवा: आमदार मुश्रीफ आप आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा देत मुश्रीफ समर्थक, कार्यकर्त्यांनी आज (दि.२५) तब्बल ८ तास मुरगूड (ता.कागल) पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले. आमदार मुश्रीफ यांच्यावर खोटी, चुकीची, बेकायदेशीर केस दाखल करुन बदनामी केली आहे. ज्यांनी ही केस दाखल केली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी  ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी समर्थकांनी डीवायएसपी संकेत गोसावी, सहायक पोलीस निरीक्षक विकास बडवे यांना निवेदन दिले. खोटा गुन्हा दाखल करणाऱ्यांवर गुन्हा दाखल केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या वेळी राज्य राखीव दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या.  मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

कागल येथील विवेक विनायक कुलकर्णी व अन्य 16 जणांनी आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर खोटी चुकीची बेकायदेशीर केस दाखल केलेले आहे. मुश्रीफ त्यांच्‍याविरोधात तक्रार दाखल करून घेण्यापूर्वी तक्रारीमध्ये तथ्य आहे का ? हे तपासून पाहणे आवश्यक होते. तथापि तशी कोणतीही चौकशी न करता भाजपचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांचे सांगण्यावरून राजकीय आकसापोटी, द्वेषा पोटी तक्रार दाखल करण्यात आली आहे. आम्हा सभासदांचा या खोट्या तक्रारीस पाठिंबा अगर संमती नाही. आम्ही सर्वजण घोरपडे साखर कारखान्याचे भाग भांडवलदार आहोत. आमच्या नावाची खोटी कागदपत्रे तयार करून आमची संमती नसताना आमच्यावतीने तक्रार दाखल करणे ही बाब गंभीर आहे, असे निवेदनात म्‍हटले आहे.

खोटे बनावट कागदपत्र तयार करून घोरपडे कारखाना बंद पाडून आम्हा सर्व शेतकरी सभासदांचे नुकसान करण्याचा दृष्ट हेतूने कारखाना बंद पाडावा या हेतूने खोटी तक्रार केली आहे. आजपर्यंत या कारखान्यावर कोणतीही तक्रार नाही; पण गेल्या काही दिवसांमध्ये राजकीय सूडबुद्धीने तालुक्यातील कायदा- सुव्यवस्था बिघडण्याच्या हेतूने आमदार हसन मुश्रीफ यांची बदनामी करण्यासाठी खोटी केस दाखल केली आहे. त्याचा निषेध आम्ही करत आहोत. भविष्यात अशा प्रकारचे खोटे गुन्हे दाखल झाल्यास कागल तालुक्यातील जनता सहन करणार नाही, याची नोंद घेऊन खोटे बिनबुडाचे गुन्हे दाखल करून घेऊ नयेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

यावेळी खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांवर तत्काळ गुन्हा नोंद करा, या मागणीवर आंदोलक ठाम राहिले. पोलिसांनी गुन्हा नोंद करण्यास टाळाटाळ केल्याने मुश्रीफ समर्थक आक्रमक झाले. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.  यावेळी गोकुळचे संचालक युवराज पाटील, जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने, माजी नगराध्यक्ष प्रविणसिंह पाटील, दिगंबर परीट, मनोज फराकटे, देवानंद पाटील, विजय काळे, रणजीत सुर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केले. शशिकांत खोत, गणपतराव फराकटे, सूर्याजी घोरपडे, जीवनराव शिंदे, सुनील चौगले, नम्रता भांदीगरे, माया चौगले, उषा सातवेकर, पूजा दबडे, डी. एम. चौगले, सुधीर सावर्डेकर, प्रवीण भोसले आदी उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button