मंत्री, न्यायाधीश, राज्यपालांचेही घर त्याने सोडले नाही…हायप्रोफाईल चोरटा रॉबिनहुडला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मंत्री, न्यायाधीश, राज्यपालांचेही घर त्याने सोडले नाही…हायप्रोफाईल चोरटा रॉबिनहुडला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Published on
Updated on

पुणे, पुढारी वृत्तसेवा: इंटरनेटवर ऑनलाईन सर्च करून शहरातील हायप्रोफाईल परिसरातील बंगल्यात जग्वारसारख्या महागड्या गाडीने येऊन चोरी करणार्‍या सराईत चोरट्याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने जालंदर, पंजाब येथून बेड्या ठोकल्या. त्याच्या इतर तीन साथीदारांना देखील अटक करण्यात आली आहे.

मोहम्मद इरफान उर्फ रॉबिनहूड उर्फ उजाला ( 33, रा. जोगिया, पुपरी, जि. सातमाढी, बिहार), शमीम शेख (26, बिहार), अब्रार शेख (25), राजु म्हात्रे (55, रा. दोघे. मुंबई) असे अटक करण्यात आलेल्यांचे नावे आहेत. तर, सुनिल यादव, पुनित यादव, राजेश यादव या त्यांचा साथीदारांवर गुन्हा दाखल आहे.

यातील आरोपी मोहम्मद इरफान उर्फ रॉबिनहूड हा मुख्य आरोपी आहे. त्याने पुर्वी दिल्लीचे स्वास्थमंत्री, गोव्याचे राज्यपाल, दिल्लीतील न्यायाधीश आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री यांच्या जावयाच्या घरी चोरी केली आहे. त्याच्यावर उत्तरप्रदेश, गोवा, पंजाब, तामिळनाडू येथे घरफोडीचे गुन्हे असून हे सर्व गुन्हे उच्चभ्रु लोकवस्ती असलेल्या परिसरातील आहेत. पोलिसांनी वेशांतर करून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून जॅग्वार कार, दहा घड्याळे आणि इतर असा 1 कोटी 21 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त नारायण शिरगावकर, सुनिल पवार, पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, अजय वाघमारे, गणेश माने, सहायक निरीक्षक विकास जाधव, नरेंद्र पाटील उपस्थित होते.

बाणेर रोड येथील सिंध सोसायटीत रॉबीनहूड आणि त्याच्या साथीदारांनी 10 फेब्रुवारी रोजी चोरी केली होती. बंगल्यातून परदेशी बनावटीचे पिस्तूल, काडतूसे आणि घड्याळासह इतर मुद्देमाल चोरून पळ काढला होता. पोलिसांनी तातडीने गुन्हे शाखेचे तीन पथके तयार करून आरोपींचा माग काढण्यास सुरुवात केली. खंडणी विरोधी पथक एक आणि दोन तसेच यूनिट चारकडून घटना घडलेल्या ठिकाणचे सीसीटीव्ही आणि इतर तांत्रिक मुद्दावरून आरोपींचा शोध घेण्यात आला. यावेळी आरोपीने गुन्ह्यात जॅग्वार कार वापरल्याचे दिसले. त्यानंतर पोलिसांनी पुणे ते नाशिक मार्गावरील 200 सीसीटीव्हींची तपासणी केल्यानंतर अधिकची माहिती काढून गाडीचा नंबर मिळवत पोलिसांनी रॉबिनहूडचा शोध घेतला. प्रत्येकवेळी तो गाडीची नंबर प्लेट बदल होता.

आरोपी हे दिल्लीला असल्याची माहिती मिळताच खंडणी विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोहनदास जाधव, सहायक फौजदार विजय गुरव, अंमलदार शैलेश सुर्वे, सयाजी चव्हाण, सारस साळवी, अमोल आव्हाड यांच्यासह पथकाने दिल्ली गाठली. त्याठिकाणी गेल्यानंतर आरोपी हा पंजाबमधील जालंधर येथे असल्याचे कळाले. त्यानुसार पोलिसांनी पंजाब येथे त्याचा शोध घेतला. त्याठिकाणी पोलिसांनी बिगारी कामगारांचे वेशांतर करून आरोपीला पकडले. त्याच्याकडून जॅग्वार कार, पिस्तूल, दागिने जप्त करण्यात आले. गुन्ह्यातील घड्याळ शमीम शेख याच्या माध्यमातून मुंबई येथे विक्रीकरीता दिले. पोलिसांनी मुंबई येथून उर्वरीत तिघांना अटक केली. तर इतर आरोपींना तामिळनाडू पोलिसांनी अटक केलेली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कामगिरी केली.

चोरीतून सामाजिक काम,पत्नी झेडपी सदस्य

रॉबिनहूड हा मूळ बिहारमधील जोगिया गावातील रहीवासी आहे. चोरीच्या पैशातून त्याने त्याच्या मूळ गावात अनेक सामाजिक कामे केली आहेत. रस्ता, रस्त्यावर लाईटींग आणि नागरिकांच्या मदतीला धावून जात असल्याने स्थानिक नागरिकांनीच त्याला रॉबीनहूड नाव दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. एवढेच नाही तर त्याची पत्नी ही संबधीत भागातील जिल्हा परिषद सदस्य असल्याचेही सांगण्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news