मला सूड भावनेतून अडकवले : अनिल देशमुख; नागपुरात जल्लोषी स्वागत | पुढारी

मला सूड भावनेतून अडकवले : अनिल देशमुख; नागपुरात जल्लोषी स्वागत

नागपूर; पुढारी ऑनलाईन : 21 महिन्यानंतर नागपुरात आलो, स्वागतासाठी नागपूरच नव्हे तर विदर्भातून कार्यकर्ते आले. मला खूप आनंद झाला, शेवटी सत्याचा विजय झाला. माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले. हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाने हे सर्व आरोप तथ्यहीन ठरविले. 100 कोटी रुपयांचा आरोप करण्यात आला मात्र चार्जशीट दाखल होईपर्यंत तो केवळ 1.71 कोटीवर आला, त्याचेही पुरावे नाहीत यातूनच सर्व प्रकार उघड झाला, न्यायदेवतेवर विश्वास होता अखेर न्याय मिळाला, अशी भावना माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी (दि.११) रात्री नागपुरात घरी पोहचल्यानंतर माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

परमवीर सिंग, सचिन वाझे यांच्या माध्यमातून आपल्याला सूड भावनेतून अडकविण्यात आले, असा आरोप देशमुख यांनी केला. मात्र,यामागे कोण हे सांगण्याचे टाळत हे तुम्हालाच अधिक माहिती असे सूचक विधान केले. 26/11चा आरोपी कसाबला ठेवले त्या तुरुंगाच्या इमारतीत 14 महिने मला डांबून ठेवले गेले हे वेदनादायी होते. 230 सहकाऱ्यांचे जबाब, 130 वेळा धाडीतूनही काही हाती लागले नाही. संघर्ष योद्धा म्हणून सर्वांनी स्वागत केल्यानंतर शक्ती मिळाली. आता संपूर्ण विदर्भात फिरणार, संघटन मजबूत करणार असल्याचे देशमुख यांनी एका प्रश्नाचे उत्तरात स्पष्ट केले.

विशेष म्हणजे उद्या रविवारी पक्षाध्यक्ष शरद पवार नागपूर मुक्कामी असून वर्धा, सेवाग्राम येथील कार्यक्रमाच्या निमित्ताने पवार यांच्यासोबत अनिल देशमुख प्रथमच बाहेर पडणार आहेत. संकटकाळात पवार यांनी धीर दिल्याचे ते म्हणाले. पवार यांनी यापूर्वीच्या विदर्भ दौऱ्यात देशमुख यांना दिलेल्या त्रासाचा हिशोब करण्याचा इशारा दिला हे विशेष.

देशमुख म्हणाले, सचिन वाझे हा दोन खून व इतर गुन्हयासह गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्यावर भरवसा ठेवता येत नाही, असे कोर्टाने नमूद केले आहे. परमवीरसिंग यांनी ऐकीव माहितीवर आरोप केल्याचे चांदीवाल आयोगापुढे म्हटले आहे. यामुळेच सत्य बाहेर आल्याने जनतेचा संभ्रम दूर झाला.

श्रद्धा बंगल्याने अनुभवली दिवाळी

मुंबईवरून आलेले अनिल देशमुख यांचे स्वागतासाठी तुतारी, रांगोळी, दिव्यांची आरास, औक्षण, फटाके असा सारा आनंदोत्सव पाहून जाता देशमुख यांच्या ‘श्रद्धा’ बंगल्याने आज जणू दिवाळीच अनुभवली. ‘सत्य परेशान हो सकता, पराजित नही’ या फलकासमोर विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. स्वागतासाठी हजारोंच्या संख्येत कार्यकर्ते आल्याने वर्ध्यात ठिकठिकाणी वाहतूक खोळंबली. भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी क्रिकेट सामना बघून व्हीसीएवरून येणाऱ्यांची यात अधिक भर पडली. माजी आमदार आशिष देशमुख यांनी राजकीय विरोधकाची भूमिका बजावली असताना त्यांचे भाऊ अमोल देशमुख मात्र कुटुंबियांसह स्वागताला हजर होते.

अधिक वाचा :

Back to top button