तासगाव; पुढारी वृत्तसेवा : पुण्यातील कसबा व चिंचवड विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदारांचे निधन झाल्यामुळे पोटनिवडणूक जाहीर झालेली आहे. निवडणूकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अगोदर २१ स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. यामध्ये आणखी २० नेत्यांची भर पडलेली आहे.
राज्यातील राष्ट्रवादीची मुलूख मैदानी तोफ अशी ओळख निर्माण झालेल्या दिवंगत आर. आर. आबा पाटील यांचे सुपुत्र तथा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सदस्य रोहित पाटील यांचे नाव स्टार प्रचारकांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे पोटनिवडणूकीत रोहित पाटील नावाची तोफ धडाडलेली पहायला मिळणार आहे.
भाजप आणि महाविकास आघाडी तसेच अपक्षही निवडणूक रिंगणात उतरले आहेत. या निवडणूकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. राष्ट्रवादीने निवडणूकीसाठी स्टार प्रचारक नेते म्हणून पहिली एक यादी प्रसिध्द केली होती. यामध्ये पक्षाअध्यक्ष शरद पवार, विरोधीपक्षनेते अजित पवार, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री सुनील तटकरे, माजी मंत्री फौजिया खान, माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे, खासदार वंदना चव्हाण, आमदार शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी महिला आघाडी प्रमुख विद्या चव्हाण, आमदार अमोल मिटकरी, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, खासदार सुप्रिया सुळे, आमदार एकनाथ खडसे, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री धनंजय मुंडे, खासदार अमोल कोल्हे, आमदार सुनील शेळके, आमदार निलेश लंके, शेख सुभान अली यांचा स्टार प्रचारक म्हणून समावेश होता.
निवडणूकीत रंग भरू लागताच पक्षाचे सचिव शिवाजीराव गर्जे यांनी स्टार प्रचारकांची दुसरी २० नेत्याची यादी प्रसिध्द केली आहे. या यादीमध्ये खासदार श्रीनिवास पाटील, आमदार हसन मुश्रीफ, आमदार दत्तात्रय भरणे, आमदार शेखर निकम, आमदार सुनील टिंगरे, आमदार रोहित पवार, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार संजय बनसोडे, आमदार संग्राम जगताप, प्रशांत जगताप, आमदार अदिती तटकरे, आमदार चेतन तुपे, आमदार प्राजक्त तनपुरे, जयदेव गायकवाड, सुरज चव्हाण, रोहित आर. पाटील सुनिल भुसारा, प्रदिप घरतकर, मेहबूब शेख, अविनाश धायगुडे यांचा समावेश आहे.
ही यादी उपमुख्य निवडणूक अधिकारी यांचेकडे पाठविण्यात आली आहे. आर. आर. आबांप्रमाणेच त्याचा मुलगा रोहित आता 205- चिंचवड आणि 215 – कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकाची धुरा संभाळताना दिसणार आहे.