अदानीशी संबंध काय? हे सांगावेच लागेल, नाना पटोले यांचा भाजपवर घाणाघात

अदानीशी संबंध काय? हे सांगावेच लागेल, नाना पटोले यांचा भाजपवर घाणाघात
Published on
Updated on

पुणे, पुढारी वृत्तसेवा: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानी यांचे काय संबंध आहेत, हे स्पष्ट करण्यासंदर्भात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेमध्ये प्रश्न उपस्थित केले. मात्र हे सर्व प्रश्न कामकाजातून वगळण्यात आले. हे दुर्दैव असून हा एक प्रकारे लोकशाहीचा खून करण्याचा प्रकार आहे. मात्र, पंतप्रधानांना या सर्व प्रश्नांची उत्तरे देशवासियांना द्यावीच लागतील, असा घाणाघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी पुण्यात केला. तसेच राज्यातील कायदा व सुव्यस्था ढासळल्याचाही आरोप केला.

पुण्यातील काँग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पटोले बोलत होते. ते म्हणाले, देशातील बँका, एलआयसीमधील पैशाची लूट करण्यात आली आहे. देशवासियांची फसवणुक केली जात आहे. यावर उपस्थित होणार्‍या प्रश्नांची उत्तरे द्यायची सोडून मोदी पान टपरीवर भाषण केल्यासारखे संसदेत भाषण करतात. भाजप नेते अदानीला काँग्रेसने मोठे केले असा आरोप करत आहे. मात्र काँग्रेसच्या सत्ताकाळात अदानी कुठे होते, आणि भाजपच्या मागील आठ वर्षाच्या सत्ताकाळात अदानी कुठे पोहोचले याची उत्तरे भाजपने द्यावी, असेही पटोले म्हणाले.

पंतप्रधान देश विकून देश चालवत आहेत. ते संविधानीक मूल्य पायदळी तुडवत आहे. देश तोडत आहेत. मात्र, राहुल गांधी देश जोडण्याचे काम करत आहेत. त्यामुळे राहुल गांधी आणि मोदी यांची तुलना होऊच शकत नाही. देशाचे गृहमंत्री अमित शहा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी पुण्यात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वारंवार मुंबई दौर्‍यावर येत आहेत, याचा स्पष्ट अर्थ भाजप बॅकफूटवर जात आहे, हे त्यांनी मान्य केले आहे. भाजपच्या विरोधात जनतेच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणात राग आहे. त्यामुळेच विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. याचीच पुनरावृत्ती कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीत होऊन महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार बहुमताने विजयी होणार आहेत, असा विश्वासही पटोले यांनी व्यक्त केला.

शरद पवार हेच आमचे राष्ट्रीय नेते

महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार जिंकण्याची आम्ही रणनीती ठरवलेली आहे. येत्या 13 तारखेला शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये येणार आहेत. निवडणुकीसाठी काँग्रेसचा कोणीही केंद्रीय नेता येणार नाही. आमचे राष्ट्रीय नेते शरद पवारच आहे. तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसची तयारी कासवगतीने सुरू असल्याच्या टिकेला उत्तर देताना पटोले म्हणाले, आम्ही जरी कासवगतीने असलो तरी शेवटी आम्हीच जिंकणार आहोत.

कायदा आणि सुव्यवस्था ढासळली

आमदारांवर, पत्रकारांवर, वकीलांवर हल्ले होत आहेत. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळलेली असून जनता असुरक्षित असताना भाजपचे आजी माजी आमदार आणि 50 खोके घेणारे यांच्या सुरक्षेवर मात्र, दिवसाला 20 लाख रुपये खर्च केले जात आहेत. ही जनतेच्या पैशाची लूट असून राज्याचा व देशाचा कारभार हुकूमशाही पद्धतीने चालवला जात आहे. प्रशासकीय यंत्रणा चुकीच्या पद्धतीने वापरली जात आहे. त्यामुळे येणार्‍या विधिमंडळाच्या अधिवेशनात आम्ही राज्यातील कायदा व सुव्यवस्था पत्रकारांची सुरक्षा या विषयावर आवाज उठवणार आहोत, असेही पटोले म्हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news