Death Of Tiger Cubs : गडचिरोलीत वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू | पुढारी

Death Of Tiger Cubs : गडचिरोलीत वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू

गडचिरोली; पुढारी वृत्तसेवा : गडचिरोली वनविभागांतर्गत कक्ष क्रमांक ४१५ पी मधील अमिर्झा बिटात वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही दोन्ही मृत बछडे टी-६ वाघिणीचेच असल्याचा अंदाज वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. (Death Of Tiger Cubs)

याबाबतच्या अधिक माहितीनुसार, पोर्ला आणि चातगाव वनपरिक्षेत्रात टी-६ वाघिणीचा वावर आहे. महिनाभरापूर्वी ती आपल्या चार बछड्यांसह वनविभागाने लावलेल्या कॅमेऱ्यात आढळून आली होती. त्यामुळे मृत बछडे टी-६ वाघिणीचेच असल्याचा अंदाज वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. ३ जानेवारीला एका बछड्याचे अवशेष आढळून आले. तेथून दोनशे मीटर अंतरावर ६ तारखेला आणखी एका बछड्याचे अवशेष दिसून आले. (Death Of Tiger Cubs)

दोन्ही अवशेष हैदराबाद येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. पोर्ला आणि चातगाव वनपरिक्षेत्राच्या सीमावर्ती भागात टी-६ वाघिणीसह आणखी पाच वाघांचे अस्तित्व आहे. त्यामुळे नर वाघाच्या हल्ल्यात दोन्ही बछडे ठार झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी काढल्याची माहिती गडचिरोलीचे उपवनसंरक्षक मिलीशकुमार शर्मा यांनी दिली.

टी-६ वाघिणीने आतापर्यंत पाचहून अधिक नागरिकांना ठार केले आहे. त्यामुळे ३० डिसेंबरला वरिष्ठांकडून परवानगी मिळाल्यानंतर या वाघिणीला पकडण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी आणि अन्य तज्ज्ञांची चमू चार-पाच दिवसांपासून परिश्रम घेत आहे. अशातच दोन बछड्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

हेही वाचा

Back to top button