हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : शहरामध्ये अनेक ठिकाणी बांधकाम केले जात आहे. या बांधकामाचे साहित्य संबंधिताकडून रस्त्यावर टाकले जात असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे नगर पालिकेच्या पथकाने अनेक ठिकाणी पाहणी दरम्यान बांधकाम साहित्य दिसून आल्याने हे तात्काळ उचलून घ्यावे अन्यथा जप्तीची मोहीम राबविली जाईल, असा इशारा दिला होता. काही जणांनी बांधकाम साहित्य उचलले नसल्याने नगर पालिकेच्या पथकामार्फत बांधकाम साहित्य जप्तीची मोहीम सुरू करण्यात आली आहे.
हिंगोली शहर सुंदर व स्वच्छ ठेवण्यावर नगर पालिकेकडून अधिक भर दिला जात आहे. प्रत्येक दिवशी स्वच्छतेकडे अधिक लक्ष दिले जात आहे. हिंगोली शहरामध्ये अनेक ठिकाणी होणार्या बांधकामास नगर पालिकेकडून परवानगी दिल्यानंतर संबंधितांकडून बांधकाम सुरू केले जात आहे. दिलेल्या नियम व अटीमध्ये वाहतुकीच्या रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकू नये, अशा सूचना दिल्या असतानाही अनेक ठिकाणी याचे उल्लंघन केल्याचे पहायला मिळत आहे. वाहतुकीच्या रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. परिणामी काही ठिकाणी अपघाताच्या घटनाही घडत आहेत.
काही भागात नगर पालिकेने नवीन सिमेंट व डांबरी रस्ते तयार केले आहेत. अशा रस्त्यावरही बांधकामाचे साहित्य टाकले जात असल्याने मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांनी याबाबत नगर पालिकेच्या पथकांना सूचना दिल्या. त्यानुसार अनेक ठिकाणी नगरपालिकेच्या पथकाने पाहणी केली. यामध्ये बर्याच बांधकाम करणार्या व्यक्तींनी रस्त्यावर सिमेंट, लोखंड, रेती, विटा यासह इतर बांधकामाचे साहित्य टाकून वाहतुकीचे रस्ते अरूंद केले आहे. नगर पालिकेच्या पथकाने संबंधित घटनास्थळाचे फोटो काढून मुख्याधिकारी मुंढे यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. त्यामुळे या बांधकाम करणार्या व्यक्तींना तात्काळ रस्त्यावरील बांधकाम साहित्य उचलून घ्यावे, अशा सूचना पालिकेमार्फत करण्यात आल्या आहेत.
या सूचना देऊनही काही जणांनी बांधकाम साहित्य उचलून घेतले नसल्याने आज (दि. ७) नगर पालिकेचे स्वच्छता निरीक्षक तथा क्षेत्रीय अधिकारी बाळू बांगर यांच्यासह पथकाने काही ठिकाणचे बांधकाम साहित्य जप्त केले आहे. तसेच त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
हिंगोली शहरामध्ये अनेक ठिकाणी करण्यात येणार्या बांधकामासाठी नगर पालिकेकडून रितसर परवानगी दिली जाते. परवानगी देताना नियम व अटी घालून दिल्या जातात तरी देखील काहीजण नगर पालिकेकडे दिलेल्या नकाशानुसार बांधकाम न करता त्या व्यतिरिक्त बांधकाम करीत असल्याचे अनेक ठिकाणी निदर्शनास आले आहे. त्यामुळे बांधकाम करणार्या संबंधित व्यक्तींनी नगर पालिकेने दिलेल्या नियम व अटीचे पालन करावे वाहतुकीच्या रस्त्यावर बांधकामाचे साहित्य टाकू नये, ज्यांनी बांधकाम साहित्य रस्त्यावर टाकले असल्यास ते तात्काळ उचलून घ्यावे, अन्यथा सदर बांधकाम साहित्य नगर पालिकेच्या पथकामार्फत जप्त करून संबंधितावर दंडात्मक कार्यवाही केली जाईल, असा इशारा मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांनी दिला आहे.
हेही वाचा :