Chandrapur : चंद्रपूर महानगरपालिकेतील भष्ट्राचाराची चौकशी करा – आमदार धानोरकर | पुढारी

Chandrapur : चंद्रपूर महानगरपालिकेतील भष्ट्राचाराची चौकशी करा - आमदार धानोरकर

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर शहरातील गोल बाजारातील गाळेधारकांची भाडेवाढ २०० पटीने वाढविलेली आहे. ही भाडेवाढ अन्यायकारक असून ती मागे घ्यावी, तसेच मागील पाच वर्षात चंद्रपूरच्या महानगरपालिकेतील भष्ट्राचाराची सखोल चौकशी करण्यासाठी चौकशी समिती गठीत करण्याची मागणी काँग्रेसच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केली. विधानसभेतील अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेदरम्यान ही मागणी त्यांनी केली.

धानोरकर यांनी दिलेल्या महितीनुसार, महानगरपालिकेत मागील ५ वर्षांमध्ये विविध प्रकारचे घोटाळे झाले आहेत. या सर्व घोटाळ्यांबद्दल वारंवार आरोप-प्रत्यारोप देखील झाले आहेत. सत्ताधारी पक्षातील पदाधिकारी आणि महापालिकेतील अधिकारी यांनी हा भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कोरोना काळातील आपत्तीमुळे महानगरपालिकेची आर्थिक स्थिती गंभीर झालेली असताना देखील, अनावश्यक खर्च करण्यात आला. अनेक निविदा प्रक्रिया या कंत्राटदारांच्या लाभासाठी राबविण्यात आल्या. या घोटाळ्यांमुळे मनपाला मोठा आर्थिक फटका बसला. सामान्य जनतेच्या पैशाचा दुरुपयोग झाला. या सगळ्याची चौकशी करण्याची मागणी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केली.

चंद्रपूर महानगरपालिकेच्या ५०० गाळेधारकांचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. ५०० गाळे मनपाच्या हद्दीत आहेत. मनपा आणि राज्य सरकारच्या करारानुसार गाळेधारकाचा कर महसूल दरवर्षी वाढवायचा असतो. मात्र, मनपाने कोणताही टॅक्स न वाढविता तीन वर्षांच्या कर महसूलाची नोटीस पाठवली आहे. त्यामुळे गाळेधारकांवर एकाचवेळी मोठा आर्थिक बोझा आला आहे. गाळेधारकांकडून वारंवार याविरोधात आवाज उठविण्यात आला होता. गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लागावा, अशी मागणी धानोरकर यांनी केली.

हेही वाचा

Back to top button