भंडारा : दारुच्या बिलावरुन बारमालकावर जीवघेणा हल्ला: चौघांना अटक | पुढारी

भंडारा : दारुच्या बिलावरुन बारमालकावर जीवघेणा हल्ला: चौघांना अटक

भंडारा: पुढारी वृत्तसेवा : दारु पिल्यानंतर बिल देण्याच्या कारणावरुन तरुणांनी बिअर बारचे कर्मचारी आणि मालकासोबत वाद घातला. त्यानंतर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न करत कर्मचारी आणि मालकाला मारहाण केली. याप्रकरणी भंडारा पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करुन त्यांना अटक केली आहे. अंकीत हडपे, जानू कटकवार, अनूप, रोहित सोनेकर (सर्व रा. टप्पा मोहल्ला, कस्तुरबा गांधी वॉर्ड, भंडारा व शनि सुभाष रनभूत रा. ग्रामसेवक कॉलनी, भंडारा) अशी आरोपींची नावे आहेत.

भंडारा नजीकच्या खोकरला गावात एक बार अ‍ॅन्ड रेस्टॉरेंट आहे. येथे ३० डिसेंबरच्‍या  रात्री काही तरुण बारमध्ये आले. बार बंद करण्याची वेळ झाल्याने बारचा कर्मचारी सचिन माटे त्‍यांना  बिल देऊन घरी जाण्‍यास सांगितले. त्यातील एकाने काऊंटरजवळ जाऊन चाकूने सचिन माटे यांच्यावर वार केला. त्‍यांनी तो चुकवला. त्‍यांनी तत्‍काळ या घटनेची माहिती बारमालक आयुश सार्वे यांना दिली.

आयुश सार्वे तेथे आले असता आरोपींनी त्यांच्याशीही वाद घालायला सुरुवात केली. तेवढ्यात आरोपींपैकी एकाने बारमालक आयुश सार्वे यांना पाठीमागून येऊन विटाच्या तुकड्याने मारहाण केली. बारमालकांसोबत भांडण सुरू असल्याने सचिन माटे याने मध्यस्थी करण्‍याचा प्रयत्‍न करत असताना एकाने सचिनच्या भावाला पाईपने मारले. तसेच संजय वाशिमकर यालाही मारहाण केली. त्यानंतर सर्वजण पसार झाले. या घटनेची फिर्याद सचिन माटे याने भंडारा पोलिसांत दिली. पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून अटक केली आहे. तपास पोलीस हवालदार विपीन लांजेवार करत आहेत.

हेही वाचा : 

Back to top button