राज्य सहकारी बँकेकडून 86 जणांना नियुक्ती पत्रे, पारदर्शी सेवक भरती प्रक्रियेबद्दल समाधान | पुढारी

राज्य सहकारी बँकेकडून 86 जणांना नियुक्ती पत्रे, पारदर्शी सेवक भरती प्रक्रियेबद्दल समाधान

पुणे, पुढारी वृत्तसेवा: राज्यातील सहकारी संस्थांची शिखर बँक असलेल्या राज्य सहकारी बँकेमध्ये तब्बल 30 वर्षांनंतर सेवक भरती प्रक्रिया राबविण्यात आली. त्या अंतर्गत पहिल्या यादीत निवड झालेल्या 86 उमेदवारांना शनिवारी (दि.31) नेमणुकीची पत्रे देण्यात आली आहेत. नववर्षाच्या आगमनालाच ही गोड बातमी मिळाल्याने उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण असून, अत्यंत पारदर्शीपणे राबविण्यात आलेल्या भरती प्रक्रियेबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

संपूर्ण राज्यातून या भरती प्रक्रियेत 242 जागांसाठी सुमारे 5 हजार 158 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. आयबीपीएस या बँकिंग क्षेत्रातील केंद्रीय संस्थेकडून लेखी परीक्षेचे आयोजन केल्यानंतर मुलाखती, ग्रुप डिस्कशन इत्यादी चाचण्यांनतर एकूण 135 उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली. त्यापैकी पहिल्या यादीत निवड झालेल्या 86 उमेदवारांना शनिवारी नेमणुकीची पत्रे देण्यात आली. नवीन नेमणूक झालेल्या या उमेदवारांना प्रथम 12 महिन्यांचा प्रशिक्षण कालावधी राहील. त्या अंतर्गत राज्य बँकेच्या व्यवसाय अनुषंगाने विविध विभागांत होणाऱ्या कामकाजाची माहिती, फिल्ड वर्क इत्यादीबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

राज्य बँकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली, तेव्हा बँकेची एकूण सेवक संख्या 1 हजार 842 इतकी होती. सेवक निवृत्ती व बँकेने राबविलेल्या स्वेच्छानिवृत्ती योजनेमुळे आजची सेवक संख्या 643 इतकी झाली आहे. मात्र, सन 2011 पासून प्रशासकाच्या नेमणुकीनंतर बँकेचा एकूण व्यवसाय 28 हजार 418 कोटी रुपयांवरून 47 हजार 27 कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. या पार्श्वभूमीवर पार पाडण्यात आलेल्या या पारदर्शी भरती प्रक्रियेबद्दल सर्व उमेदवारांनी समाधान व्यक्त केल्याची माहिती राज्य बँकेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अजित देशमुख यांनी दिली.

“राज्य बँकेच्या भरतीय प्रक्रियेत अत्यंत स्पर्धात्मक निवड चाचण्यांमधून उमेदवारांची निवड करण्यात आली असून, सर्वच उमेदवार उच्च शिक्षित आहेत. त्यामध्ये 8 उमेदवार बी.टेक- एम.टेक, 31 उमेदवार सिव्हील-कॉम्प्युटर इंजिनिअर व 10 उमेदवार कृषी पदवीधर आहेत. त्यामुळे राज्य सहकारी बँकेची हीच खरी भविष्यातील मालमत्ता आहे. तसेच, सहकारी बँकिंग क्षेत्राच्या प्रगतीसाठी सर्वांनीच पारदर्शी व गुणात्मक भरती प्रक्रिया राबविण्याची गरज आहे.
– विद्याधर अनास्कर, प्रशासक, राज्य सहकारी बँक लिमिटेड, मुंबई.

Back to top button