एसटीची महाकार्गो सुसाट; ११४ कोटींचे उत्पन्न महामंडळाच्या तिजोरीत जमा | पुढारी

एसटीची महाकार्गो सुसाट; ११४ कोटींचे उत्पन्न महामंडळाच्या तिजोरीत जमा

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : आर्थिक संकटात सापडलेल्या एसटी महामंडळाला महाकार्गोने नवसंजीवनी दिली आहे. मे २०२० पासून सुरु एसटीच्या मालवाहतुकीने आतापर्यत ११४ कोटी ९६ लाखांचे उत्पन्न महामंडळाच्या तिजोरीत जमा केले आहे. त्यामुळे महामंडळाने येत्या काळात मालवाहतुकीवर विशेष भर देण्याचा निर्णय घेतला आहे.

टाळेबंदीत जीवनावश्यक वस्तूंचा तसेच इतर मालांच्या वाहतूकीत खंड पडू लागल्याने २१ मे २०२० पासून एसटीच्या मालवाहतुकीला राज्य सरकारने मंजुरी दिली. अल्पावधीतच मालवाहतूकीला मिळालेला प्रतिसाद पाहून महामंडळाने ‘महाकार्गो’ या नावाने हा ब्रँड विकसित केला. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांत विभाग नियंत्रकांमार्फत मालवाहतूकीचे नियोजन केले जाते. मालवाहतुकीवर महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयातून नियंत्रण ठेवले जात असून, मालवाहतूकीसाठी स्वतंत्र विभाग निर्माण केला.

एसटीच्या ताफ्यात ‘महाकार्गो’चे ११०० ट्रक आहेत. आतापर्यंत दोन कोटी ४९लाख ५७ हजार ६०५ किलोमीटर महाकार्गोची धाव झाली आहे. त्यातून महामंडळाला ११४ कोटी ९६ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. शासनाच्यावतीने रेशनिंगवर पोहोचविला जाणारा अन्न-धान्यांचा पुरवठा, बी-बियाणे, शालेय पुस्तके, निवडणूक आयोगाची मतदान यंत्रे, कोकणातील आंबा बागायतदार तसेच सिमेंट कंपन्यांही माल वाहतुकीसाठी ‘महाकार्गो’चा उपयोग करीत आहेत.

शासकीय विभागाची २५ टक्के मालवाहतूक एसटीकडे परंतु रेशनिंग विभागाची नाही. विविध शासकीय विभागामार्फत खासगी मालवाहतूकदारांकडून जी मालवाहतूक होते, त्यातील २५ टक्के माल वाहतुकीचे काम एसटीला देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे महामंडळाला आर्थिक फायदा होत आहे. तसेच स्वस्त धान्याची राज्यात वाहतूक करण्याचे काम एसटीला देण्यासंदर्भात चर्चा सुरु आहे. हे काम जर एसटीला मिळाले तर एसटीला मोठा आर्थिक फायदा होणार आहे.

हेही वाचा  :

Back to top button