बुलढाणा: चाकूचा धाक दाखवत लूटमार करणारी टोळी जेरबंद | पुढारी

बुलढाणा: चाकूचा धाक दाखवत लूटमार करणारी टोळी जेरबंद

बुलढाणा: पुढारी वृत्तसेवा :  कारच्या काचा फोडून चाकूचा धाक दाखवत अडीच हजार रुपये रोख व पंचवीस हजारांचा मोबाईल लुटून नेणाऱ्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले. सर्व आरोपी जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यातील रहिवासी आहेत. न्यायालयाने आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

संतोष शंकर गायकवाड (वय २८) , परशूराम सिध्दू जाधव (वय २५, रा. सवासणी), वैभव गजानन गावंडे (वय २१, रा. भराडखेडा), कृष्णा भगवान चोपडे (वय २२, रा. सोनगिरी), गजानन रामप्रसाद प्रसाने (वय २१, रा. डोलखेड) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली कार, मोबाईल (किंमत ३५ हजार), चोरलेला वन प्लस मोबाईल (किंमत २५ हजार) तसेच लुटलेले रोख २ हजार ५०० रूपये असा एकूण ३ लाख ६२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, खामगाव येथील प्रशांत वाकेकर व त्यांचे दोन मित्र ११ डिसेंबरच्या रात्री औरंगाबाद येथून परतत असताना चिखलीजवळील पेठ गावाजवळ त्यांच्या कारचे डिझेल संपले. कार महामार्गाच्या कडेला उभी करून ते मित्रांसह आतमध्ये बसले होते.  मध्‍यरात्री अडीचच्‍या सुमारास खामगावकडून आलेली  कार वाकेकर यांच्या कारजवळ थांबली. चोरट्यांनी वाकेकर यांच्या कारच्‍या काचा फोडून चाकूचा धाक दाखवत त्यांचा एक वन प्लस मोबाईल व रोख दोन हजार पाचशे रूपये जबरीने लुटून नेला.

याबाबत अमडापूर पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला होता. तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेची चार पथके व अमडापूर पोलिसांचे एक पथक कार्यरत होते. गुन्ह्यात वापरलेल्या कारचा महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या माध्यमातून छडा लागला. संशयित आरोपी हे जाफ्राबाद (जि.जालना) तालुक्यातील ग्रामीण भागातील असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.

हेही वाचा : 

Back to top button