पुढारी ऑनलाईन: काही देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. मात्र सध्याची भारतातील कोरोनाची रिस्थिती पाहता, आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद करण्याची किंवा लॉकडाउन करण्याची गरज नाही, असे 'एम्स'चे माजी संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे. सध्या भारतातील परिस्थिती पूर्ण नियंत्रणात असून, नागरिकांना घाबरण्याची गरज नसल्याचे तसेच बनारस हिंदू विद्यापीठातील (BHU) शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.
चीनमध्ये कोरोनाचा फैलाव वाढल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून सराकारने देखील पाऊले उचलायला सुरूवात केली आहे. या परिस्थितीवर सरकारने बारकाईने लक्ष ठेवत, सूचना जारी केल्या आहेत. सरकारने सर्व राज्यांसाठी सूचना जारी करत, देशातील कोरोना टेस्टही वाढवण्यात आल्या आहेत.
'एम्स' रूग्णालयाचे माजी संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना सांगितले की, भारतीय लोकामंध्ये 'हायब्रीड इम्युनिटी' दिसून येत आहे. त्यामुळे येथे संसर्ग वाढला तरी गंभीर प्रकरणे किंवा रूग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासणार नाही. मात्र भारतातील लोकांना कोरोना प्रतिबंधात्मक उपायांचे सतत पालन करणे गरजेचे आहे.
काही सावधगिरी बाळगल्यास या नव्याने सुरूवात झालेल्या कोरोना संसर्ग लाटेचा धोका कमी होऊ शकतो. भारतात मोठ्या प्रमाणात लसीकरण झाल्याने आणि भारतीय लोकांमध्ये आधीच संकरित प्रतिकारशक्ती असल्यामुळे लोकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले आहे.
सफदरजंग हॉस्पिटलमधील पल्मोनरी क्रिटिकल केअर विभागाचे डॉ. निरज गुप्ता यांनी म्हटलं आहे की, चीन आणि इतर काही देशांमध्ये कोविड-19 ची वाढती प्रकरणे पाहता आपण आधीच सावध राहणे आवश्यक आहे. भारतीयांना याची भीती बाळगण्याचे कारण नसले तरी योग्य खबरदारी घेतली पाहिजे. मास्क घालणे, वारंवार हातांची स्वच्छता करणे, सामाजिक अंतर ठेवणे यांसारख्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. या उपाययोजना भारतातील कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.