टी-२० सारखे सरकार : कार्यकर्त्यांनो त्यागाची तयारी ठेवा : देवेंद्र फडणवीस | पुढारी

टी-२० सारखे सरकार : कार्यकर्त्यांनो त्यागाची तयारी ठेवा : देवेंद्र फडणवीस

नागपूर : पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडीमुळे आपल्या सरकाराला फक्त अडीच वर्षांचा कार्यकाळ मिळणार आहे. त्यामुळे टी-२० खेळायचे आहे. अडीच वर्षांत शिखर गाठायचे आहे. अशा वेळी कार्यकर्त्यांनी मला काय मिळणार हा विचार सोडून त्यागाची तयारी ठेवावी. पुढच्या निवडणुकीनंतर आपल्याला कसोटी सामना खेळण्याची संधी मिळणार आहे. तेव्हा प्रत्येकाला अपेक्षेनुसार सर्व काही मिळणार असल्याचा सबुरीचा सल्ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीच्या समारोपात ते बोलत होते.

फडणवीस म्हणाले की, विरोधकांमध्ये काही दम नाही. ते आपल्यासोबत लढूच शकत नाही. सध्या आपली लढाई भाजपच्या बदनामीसाठी पसरवल्या जात असलेल्या अफवांविरुद्ध असून याकरिता प्रत्येकाला सोशल मीडियाचा वापर करावाच लागणार आहे. खरे-खोटे जनतेपर्यंत पोहोचावावे लागेल, असे आवाहनही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद खरेतर साठ वर्षे जुना आहे. मात्र केवळ भाजपला बदनाम करण्यासाठी तो पद्धतशीरपणे उकरून काढण्यात आला. याकरिता विरोधकांकडून गावकऱ्यांना भडकवले जात आहे. ज्यांनी शिवाजी महाराजांच्या वंशजांना पुरावे मागितले त्यांना आता छत्रपतींचा पुळका आला आहे. एखादी खोटी गोष्ट वारंवार सांगितली. तर काही दिवसांनी ती खरी वाटायला लागते. त्यामुळे भाजपच्या प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने तत्काळ प्रत्युत्तर दिले पाहिजे. याकरिता सोशल मीडियाचा अधिकाधिक वापर केला पाहिजे यावर भर दिला. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, विश्वास पाठक, केशव उपाध्ये आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

आज पदाधिकाऱ्यांपेक्षा भाजपचे सामान्य कार्यकर्ते हेच प्रामाणिकपणे करीत असल्याचा चिमटा काढला. राज्यातील ९ जिल्हाध्यक्ष सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करीत आहेत. ३१ जिल्हाध्यक्ष आपल्या मानकांप्रमाणे याचा फारसा वापर करीत नाही तर १५ अध्यक्ष सोशलमीडियाचा वापरच करीत नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते आठ आठ दिवस फेसबुक बघत नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button