Fifa world cup : मेस्सी… मेस्सी..! अर्जेंटिना आनंदोत्सवात धुंद
ब्युनोस आयर्स; वृत्तसंस्था : अर्जेंटिनाने वर्ल्डकप जिंकल्यानंतर अर्ध्याहून अधिक जगात जल्लोषाचे वातावरण होते. संपूर्ण अर्जेंटिना देश आनंदात न्हावून निघाला. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात अर्जेर्ेंटिनाने फ्रान्सला पेनल्टी शूटआऊटवर हरवले. 36 वर्षांनंतर मिळालेला विश्वविजय प्रत्येक जण आपापल्या परीने साजरा करीत आहे. अर्जेंटिनातील अनेक शहरांत सार्वजनिक ठिकाणी मोठ मोठे स्क्रीन लावण्यात आले होते. अनेक मोठे चौक गर्दीने फुलून गेले होते.
अर्जेंटिनाच्या विजयानंतर या गर्दीला आनंदाचे उधाण आले. लोक बेभान होऊन मेस्सी… मेस्सी म्हणून ओरडत होते. नाचत होते, गात होते. एकमेकांना आलिंगन देत होते, त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. त्यांच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. मेस्सीने त्यांच्या देशासाठी विश्वचषक जिंकला होता. त्याचे स्वत:चे स्वप्न पूर्ण झालेच होते; परंतु त्याचबरोबर देशालाही त्याने विश्वचषक जिंकून दिला. हा अर्जेंटिनाचा तिसरा विश्वविजय आहे. यापूर्वी त्यांनी 1978 आणि 1986 साली वर्ल्डकप जिंकला होता. मेस्सीचे शहर म्हणून ओळखले जाणारे रोसारियो शहरात तर या आनंदोत्सवाने परमोच्च बिंदू गाठला होता.
महागाईच्या चटक्यांवर फुंकर
अर्जेंटिनामध्ये महागाई प्रचंड वाढली आहे. जगण्यासाठी एका व्यक्तीला सरासरी 30 हजारांच्या पुढे खर्च येत आहे. त्यामुळे कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी अनेक लोक दोन दोन नोकर्या करीत आहेत. आर्थिक समस्येने त्रस्त असलेल्या आणि महागाईने होरपळलेल्या अर्जेंटिनीयन जनतेला या विजयाने आपले दुःख विसरून आनंदाचे क्षण अनुभवता आले.

