नागपूर : महाराष्ट्रातील कुणीही कर्नाटकात जाणार नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | पुढारी

नागपूर : महाराष्ट्रातील कुणीही कर्नाटकात जाणार नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शनिवारी (दि. १०) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येला आढावा घेण्यासाठी नागपुरात आले होते. यावेळी त्यांनी विमानतळावर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद मुद्यावर मत व्यक्त केले. महाराष्ट्रातील कोणीही कर्नाटकात जाणार नाही. तसेच महाराष्ट्रातील कोणत्याही व्यक्तीला त्रास होणार नाही याची काळजी घेत आहोत, असे प्रतिपादन यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.

पुढे ते म्हणाले की, महाराष्ट्रातील कुणीही कर्नाटकात जाणार नाही, ही सरकार म्हणून आमची जबाबदारी आहे. त्यामुळे यासंदर्भात कुणीही आता भाष्य करू नये. आम्हाला भडकवण्याचा प्रयत्न करू नये, असा सल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना दिला. अधिवेशनापूर्वी मंत्रीमंडळ विस्ताराबाबत विचारले असता, या प्रश्‍नावर उत्तर देण्याचे त्यांनी टाळले.

कुणी कितीही केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटले, तरी आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत, असे ट्विट कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केले. याबाबत विचारले असता मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, सीमावाद सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे अशा प्रकारचे कोणतेही भाष्य करणे योग्य नाही. आम्ही त्यांना आधीच सांगितलं आहे की, सीमेवर राहणाऱ्या महाराष्ट्रातील लोकांची काळजी घेण्याचे काम तुमचे आहे. त्याप्रमाणे त्यांनी कार्यवाही देखील केलेली आहे. सोबत महाराष्ट्रातील लोकांना ज्या सोयी सुविधा द्यायच्या आहेत, त्याचाही निर्णय आम्ही घेतला आहे.

सीमावादाच्या लढ्यातही मी होतो. तो प्रश्‍न लवकरच सुटेल. सीमेवर राहणाऱ्या लोकांना कर्नाटक सरकारने योजनेच्या सुविधा देणे बंद केले होते, त्या आम्ही आता सुरू केल्या आहेत. सीमावादासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा झालेली आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसोबतही मी स्वतः बोललो आहे. महाराष्ट्रातल्या लोकांना कुठलाही त्रास होऊ नये, हे त्यांना सांगितले आहे. पंतप्रधान, गृहमंत्री आणि संबंधित सर्वांना या प्रश्‍नाची जाणीव आहे. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग नागपूर ते शिर्डी या ५३० किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे लोकार्पण उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. हजारो, लाखो लोकांना वरदान ठरणारा हा महामार्ग आहे. जेव्हा या कामाची सुरुवात झाली, तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. त्यांच्या संकल्पनेतून हा महामार्ग आकारास आला. या रस्त्याचे काम जेव्हा सुरू होते, तेव्हा या कामाची जबाबदारी एमएसआरडीसीकडे होती आणि त्या खात्याचा मी मंत्री होतो आणि आज मुख्यमंत्री आहे. या कामाची सुरुवात आणि लोकार्पण माझ्याच कार्यकाळात बघायला मिळतो आहे, ही भाग्याची गोष्ट आहे.

हेही वाचा

Back to top button