राज्यघटनेच्या रक्षणासाठी भारत जोडो : राहुल गांधी | पुढारी

राज्यघटनेच्या रक्षणासाठी भारत जोडो : राहुल गांधी

वाशिम;  पुढारी वृत्तसेवा :  कारी येथून निघालेली भारत जोडो यात्रा ही भारतीय राज्यघटनेचे रक्षण करण्यासाठी काढण्यात आली आहे, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

वाशिम-अकोला सीमेवरील मेडशी येथे बुधवारी सायंकाळी ही यात्रा पोहोचली. मेडशी येथे आयोजित सभेत राहुल यांनी यात्रेमागील भूमिका विशद केली. यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. कोणतीही शक्ती यात्रेला श्रीनगरला जाण्यापासून रोखू शकत नाही, असे ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज, म. फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महाराष्ट्रातील महापुरुषांनी देशाला दिशा देण्याचे काम केले, असे ते म्हणाले.

भाजपच्या धोरणामुळे देशाची एकात्मता धोक्यात आली आहे. शेतकर्‍यांनाही पुरेशी मदत मिळत नाही. विम्याचे पैसे भरूनही हातात काहीच पडत नाही, अशा तक्रारी शेतकरी करीत असल्याचे त्यांनी सांगितले. राहुल गांधी यांनी रस्त्यावर ठिकठिकाणी असलेल्या मुलांशी संवाद साधला. यात्रा सायंकाळी उशिरा अकोला जिल्ह्यातील पातूर येथे दाखल झाली. यात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

Back to top button