वर्धा : बांगडापूर जंगल परिसरात वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार | पुढारी

वर्धा : बांगडापूर जंगल परिसरात वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार

वर्धा; पुढारी वृत्तसेवा : वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घाडगे) तालुक्यातील बांगडापूर जंगल परिसरात जनावरे चरायला गेलेला गुराखी वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ निर्माण झाली आहे.  होरेश्वर घसाड असे मृत गुराख्याचे नाव आहे.

होरेश्वर घसाड नेहमीप्रमाणे जनावरे घेऊन चराईसाठी गेले होते. सायंकाळच्या सुमारास त्यांच्यावर वाघाने हल्ला केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. चरायला गेलेले जनावरे घरी परत आले. मात्र होरेश्वर परत न आल्याने नागरिक शोधण्यासाठी गेले असता नागरिकांना त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. रात्रीच्या सुमारास पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांसह वनविभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. मंगळवारी शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आले.

गुराख्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने बांगडापूर शिवारातील नागरिकांचा आक्रोश पाहायला मिळाला. मंगळवारी कारंजा येथील ग्रामीण रुग्णालयात काही काळ तणावाचे वातावरण होते. जंगला लगत असलेल्या शेतीला ताराचे कुंपण देण्याची मागणी तसेच मृतकाच्या पत्नीला वनविभागात नोकरीत सामावून घेण्याची मागणी करण्यात आली. तणावाचे वातावरण पाहता ग्रामीण रुग्णालयात पोलिसांचा मोठा फौजफाटा होता. वनविभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी यांनी जंगल परिसरातील नागरिकांना आश्वासन दिले. मृतकाच्या कुटुंबियांना १० लाखाचा धनादेश व अंत्यसंस्काराकरिता २० हजार रुपये मदत देण्यात आले.

यावेळी विभागीय दक्षता वनअधिकारी कोडपे, जी.पी. बोबडे, ए.एस. ताल्हण, कारंजा वनपरिक्षेत्र अधिकारी, आर्वी, आष्टी, तळेगाव येथील वनपरिक्षेत्र अधिकारी, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सरिता गाखरे, माजी उपसभापती जगदीश डोळे, बाळा जगताप, गोपाळ कालोकार, आर्वी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे, कारंजा येथील पोलीस निरीक्षक दारासिंग राजपूत, तळेगाव येथील ठाणेदार आशिष गजभिये, आष्टी येथील पोलीस निरीक्षक लोकरे आदी ग्रामीण रुग्णालयात उपस्थित होते.

Back to top button