‘हिजाब-डे’ च्या नावाखाली नागपुरात हिंदू मुलींना बुरखा घालण्याचा प्रयत्‍न | पुढारी

'हिजाब-डे' च्या नावाखाली नागपुरात हिंदू मुलींना बुरखा घालण्याचा प्रयत्‍न

नागपूर ; पुढारी वृत्तसेवा : सिव्हिल लाईनमधील रामगिरी या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या रस्त्यावर काही अज्ञात मुस्लिम मुलींनी ‘हिजाब-डे’ च्या नावाखाली अल्पवयीन हिंदू मुलींना बुरखा घालण्याचा प्रकार केला. तिथे फिरणाऱ्या काही जागरूक नागरिकांनी हस्तक्षेप करीत हा प्रकार हाणून पाडला. त्यानंतर विश्व हिंदू परिषदेने ‘हिजाब-डे’ विषयी पोलिस ठाण्यात याची तक्रार दाखल केली.

या प्रकरणी सदर पोलिस ठाण्याचे ठाणेदार विनोद चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता विहिंपने दाखल केलेल्या तक्रारीची चौकशी सुरू असल्याचे सांगितले.

चौकशीत जे काय निष्पन्न होईल त्या नुसार कायदेशीर कारवाई केली जाईल, असे ठाणेदार चौधरी यांनी सांगितले.

हिजाब घालून संपूर्ण मुस्लिम परिवेशातील चार ते पाच मुली रामगिरी रोडवर पहाटे पत्रके वाटून अल्पवयीन मुलींना बुरखा घालीत होत्या.

हा प्रकार लक्षात येताच काही जागरूक नागरिकांनी या बुरखा घातलेल्या मुलींचे बुरखे उतरवले.

तसेच संबंधित मुलींना याचा जाब विचारला. सुरूवातीला पत्रके वाटणाऱ्या मुलींनी हिंदू मुलींनी स्वेच्छेने बुरखे घातल्याचा दावा केला.

परंतु आक्षेप कर्त्यांचा दबाव वाढताच त्यांनी तिथून काढता पाय घेतला. या प्रकाराची छायाचित्रे व व्हिडीओ व्हायरल झाली.

यामुळे चांगलीच खळबळ माजली.

या प्रकरणी विहिंपचे महानगर उपाध्यक्ष अमित बेम्बी, बजरंगदल सहसंयोजक रिषभ अरखेल, नारी सुरक्षा प्रमुख विनोदचंद्र नायर, संदीप नायर, रोहन बोदेले, अनिकेत अरखेल, ईशान जैन आदींनी या प्रकरा विषयी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीत संबंधित अज्ञात महिलांच्या वाहनांचे क्रमांकही देण्यात आले आहेत.

Back to top button