दुबई; पुढारी ऑनलाईन : गरिबांना परवडेल असा पदार्थ म्हणजे वडापाव! मुंबईतील वडापाव जगात प्रसिद्ध आहे. मात्र, सध्या दुबईतील एका रेस्टॉरंटमधील वडापाव चर्चेत आला आहे. दुबईमधील ओ पाव (O Pao) नावाच्या रेस्टॉरंटमध्ये सोन्याचा वडापाव (The World's First 22 Karat O' Gold Vada Pav) लाँच करण्यात आला आहे.
या वडापावची किंमत ९९ दिरहम म्हणजेच २ हजार रुपये ठेवण्यात आली आहे. पण हा वडापाव केवळ रेस्टॉरंटमध्येच खाता येतो. त्याला बाहेर घेऊन जाण्यासाठी परवानगी नाही.
हा वडापाव जगातील पहिला २२ कॅरेटवाला गोल्ड प्लेटेड वडापाव (22 Karat O' Gold Vada Pav) असल्याचा दावा करण्यात आला आहे. हा पदार्थ ट्रफल बटर आणि चीजपासून बनविण्यात आला आहे.
या वडापावास २२ कॅरेट सोन्याच्या वर्खपासून झाकून ठेवण्यात येतो. यामुळे त्याची किंमत सामान्य वडापाव पेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे.
हा वडा तयार करताना बटाट्याच्या भाजीत चीजचा पावर केला जातो. त्यानंतर पिठात बुडवून वडा तळला जातो.
एका रिपोर्टनुसार, ज्या रेस्टॉरंटने हा वडापाव लाँच केला आहे ते रेस्टॉरंट गेल्या अनेक वर्षापासून वेगवेगळ्या पद्धतीच्या वडापावसाठी प्रसिद्ध आहे. भारतीय खाद्यपदार्थांसाठी हे रेस्टॉरंटमध्ये दुबईत प्रसिद्ध आहे. आता सोन्याच्या वडापावमुळे हे रेस्टॉरंट चर्चेत आले आहे. सोन्याच्या या वडापावचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
या वडापावमध्ये चीज आणि फ्रेंच बटरचा वापर करण्यात आला आहे. याचा ब्रेड आणि मेयोनीज सोबत आस्वाद घेता येतो. हा वडापाव लाकडाच्या पेटीतून ग्राहकांना दिला जातो. तो अधिक आकर्षक दिसावा यासाठी पेटीत नायट्रोजनचा प्रयोग करण्यात आला आहे.
यासोबत ग्राहकांना स्वीट पोटॅटो फ्राय दिले जातात, असे रेस्टॉरंटकडून सांगण्यात आले आहे.
दुबईत खूप वर्षांपासून फूड डिश सोबत काही प्रमाणात सोन्याचा वापर केला जात आहे. याआधी इथे सोन्याचा वापर करुन बर्गर, आइसक्रीम, फ्रेंच टोस्ट आणि बिर्याणी असे पदार्थ बनविण्यात आले आहेत.