चंद्रपूर : घुग्घूसमध्ये चक्क शंभर फूट जमिनीत गाडले घर; ग्रामस्थ धास्तावले | पुढारी

चंद्रपूर : घुग्घूसमध्ये चक्क शंभर फूट जमिनीत गाडले घर; ग्रामस्थ धास्तावले

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर जिल्यातील घुग्घूस येथील अमराई वार्डातील गजानन मडावी यांचे घर तब्बल सुमारे शंभर फुट खोल जमिनीत गाडले गेल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना शुक्रवारी (दि.२६ऑगस्ट) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेनंतर आमराई वार्डात तसेच घुग्घूसमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या ठिकाणच्या बंद करण्यात आलेल्या कोळसा खाणीत नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाचे पाणी घुसल्याने हा प्रकार घडला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तविल्या जात आहे. प्रशासनाने गजानन मडावी यांच्या घराशेजारील लोकांना स्थलांतरीत करायला सुरूवात केली आहे.

बैलपोळ्याची तयारी करत असताना चंद्रपूर शहरापासून २५ किमी अंतरावरील घुग्घूस शहरातील आमराई वार्डातील गजानन मडावी यांचे घर हलायला लागले. भूकंपाच्या घटना या स्वरूपाच्या असतात त्यामुळे मडावी कुटूंबिय प्रचंड धास्तावले. त्यांना काहीही सुचेना यानंतर प्रचंड आरडाओरड झाली. काही वेळातच सर्वजण घराबाहेर पडले आणि क्षणात मातीचे असलेले संपूर्ण घर सुमारे शंभर फुट जमिनीत गाडल्या गेले. काही वेळ मडावी कुटूंबीय त्या ठिकाणी थांबले असते तर एका मोठ्या घटनेला सामोरे जावे लागले असते. घटनास्थळाजवळील इतर घरातील नागरिकही घराबाहेर पडले. नुकताच मुसळधार पाऊस येऊन गेल्याने या ठिकाणी परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे या ठिकाणी ही घटना घडली असावी अशी शक्यता वर्तविली जात आहे.

या घटनेनंतर महसूल, पोलीस व वेकोली प्रशासनाला माहिती देण्यात आली आहे. तहसीलदार निलेश गौड, ठाणेदार बाबासाहेब पुसाटे व वेकोलीचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या घराशेजारील अन्य कुटूंबियांचे घरे खाली करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. तसेच त्या ठिकाणचा विद्यूत पुरवठा खंडीत करण्यात आला आहे.

सुत्रांनी दिलल्या माहितीनुसार सन १९८० च्या पूर्वी घुग्घुस परिसरात रॉबर्टसन इक्लाइन भूमिगत तीन कोळसा खाणी होत्या. पहिली घुग्घुस कॉलरी क्रमांक 1, पिट्स कॉलरी २, नकोडा कॉलरी ३ आदींचा समावेश आहे. या भूमिगत कोळसा खाणीतून प्रचंड प्रमाणात कोळसाचे उत्खनन करण्यात आले. कालांतराने त्या तिन्ही भुमीगत कोळसा खाणी बंद करून खुल्या कोळसा खाणी सुरू करण्यात आल्या होत्या. त्यांनतर २०१६ मध्ये वेकोली व्यवस्थापनाने या परिसरातील खुल्या कोळसा खाणीही बंद केल्या. परंतु भूमिगत आणि खुल्या खाणींमध्ये घुग्घूस शहरपरिसरात पोकळी निर्माण झाली आहे. नुकत्याच येऊन गेलेल्या मुसळधार पावसाने कोळसा खाणीतील खुल्या जागेत पाणी गेल्याने व आतमध्ये पोकळी निर्माण झाल्याने गजानन मडावी यांचे घर जमिनीत गाडल्या गेले असावे निष्कर्ष मांडण्यात येत आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button