चीनमध्ये दुष्काळाची चाहूल, जगातील अन्नधान्याचे बिघडू शकते समीकरण; अनेक देशांवर होणार परिणाम | पुढारी

चीनमध्ये दुष्काळाची चाहूल, जगातील अन्नधान्याचे बिघडू शकते समीकरण; अनेक देशांवर होणार परिणाम

पुढारी ऑनलाईन: जगभरातील बदलते हवामान अनेक देशांसाठी संकटाचे कारण बनत आहे. चीनमध्ये कडाक्याची उष्णता आणि कमी पाऊस यामुळे दुष्काळाचे इशारे सातत्याने दिले जात आहेत. चीनच्या काही प्रांतांमध्येही त्याचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत चीनमधील उत्पादनात घट झाल्यास जगातील अन्न पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गहू आणि तांदूळ उत्पादनात चीन जगातील पहिल्या क्रमांकाचा देश आहे. त्याचबरोबर मका उत्पादनात जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. चीनमधील उत्पादन कमी होण्याचा अर्थ असा की, अनेक लहान आणि गरीब देशांवरही त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.

भारताविषयी बोलायचे झाले तर देशाच्या स्वातंत्र्यानंतर भारताने अन्नधान्याच्या क्षेत्रात प्रचंड क्षमता प्राप्त केली आहे. हरित क्रांतीच्या युगात भारताने या क्षेत्रात स्वत:ला स्वावलंबी बनवले आहे. यामुळेच आज जग भारताकडे दुर्लक्षित करू शकत नाही. प्रसिद्ध झालेल्या ताज्या आकडेवारीनुसार, भारत मका उत्पादनात पाचव्या क्रमांकावर असून तांदूळ आणि गहू उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर आहे.

2019 च्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, मका उत्पादनात अमेरिका (346 लाख टन) पहिल्या स्थानी आहे. त्यानंतर चीन (261 लाख टन), तिसऱ्या क्रमांकावर ब्राझील (101.1 लाख टन), चौथ्या क्रमांकावर अर्जेंटिना (56.9 लाख टन), पाचव्या क्रमांकावर युक्रेन (35.6 लाख टन), सहाव्या क्रमांकावर भारतासह मेक्सिको (27.2 लाख टन) इंडोनेशिया (22.6 लाख टन) सातव्या तर रोमानिया (17.4 लाख टन) आठव्या क्रमांकावर आहे.

तांदुळाच्या उत्पादनात 211.4 लाख टन उत्पादनासह चीन पहिल्या क्रमांकावर होता. त्यापाठोपाठ भारत (177.6 लाख टन), तिसऱ्या क्रमांकावर इंडोनेशिया आणि बांगलादेश (54.6 लाख टन), चौथ्या क्रमांकावर व्हिएतनाम (43.5 लाख टन), पाचव्या क्रमांकावर थायलंड (28.6 लाख टन), सहाव्या क्रमांकावर म्यानमार (26.3 लाख टन), सातव्या क्रमांकावर फिलिपाइन्स (18.8 लाख टन) तर कंबोडिया (10.9 लाख टन) आठव्या क्रमांकावर आहे. इतर देशांनी या कालावधीत एकूण १२४.७ लाख टन तांदुळाचे उत्पादन घेतले.

गव्हाच्या उत्पादनात चीन 133.6 लाख टन उत्पादनासह पहिल्या क्रमांकावर होता. यानंतर भारत (१०३.६ लाख टन), तिसऱ्या क्रमांकावर रशिया (७४.५ लाख टन), चौथ्या क्रमांकावर अमेरिका (५२.६ लाख टन), पाचव्या क्रमांकावर फ्रान्स (४०.६ लाख टन), सहाव्या क्रमांकावर कॅनडा (३२.७ लाख टन) आहे. सातव्या क्रमांकावर युक्रेन (२६.४ लाख टन), आठव्या क्रमांकावर पाकिस्तान (२४.३ लाख टन) आहे. इतर देशांनी 2019 मध्ये एकूण 251.7 लाख टन गव्हाचे उत्पादन घेतले.

Back to top button