चंद्रपूर : बगड खिडकी येथे ‘हेरिटेज ॲक्शन’ अंतर्गत ‘बैठा सत्याग्रह’ | पुढारी

चंद्रपूर : बगड खिडकी येथे 'हेरिटेज ॲक्शन' अंतर्गत 'बैठा सत्याग्रह'

चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर शहराला गोंडकालीन वारसा लाभला असून अनेक वास्तू आजही येथे ऐतिहासिक क्षणांची साक्ष देतात. मात्र, या वास्तू काही ठिकाणी क्षतिग्रस्त झाल्या आहेत. त्या जतन आणि संवर्धन करण्याच्या मागणीसाठी इको-प्रो संस्थेच्या वतीने जागतिक वारसा दिनाचे औचित्य साधून आज ( दि.१८) गांधी चौक येथून जनजागृती पदयात्रा काढण्यात आली.

जटपूरा गेट ते रामाळा तलाव मार्गे ही पदयात्रा बगड खिडकी येथे पोहचली. यात शेकडो महाविद्यालयीन विदयार्थी सहभागी झाले होते. बगड़ खिडकी येथे टुटलेल्या किल्ला भिंतीस लागून ‘हेरिटेज ॲक्शन’ अंतर्गत ‘बैठा सत्याग्रह’ करण्यात आला. यावेळी यामागची भूमिका इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी विषद केली.

सकाळी गांधी चौक येथून जनजागृती पदयात्रा निघाली. यात शहरातील चारही गोंडकालीन गेटची प्रतिकृती हातात घेवून ऐतिहासिक वारसा संवर्धनासाठी जनजागृती करण्यात आली. पदयात्रा ते बैठा सत्याग्रह सकाळी सात ते अकरा या वेळेत पूर्ण करण्यात आला. या पदयात्रा सत्याग्रहामध्ये सरदार पटेल महाविद्यालय, जनता महाविद्यालय, सुशिलाबाई रामचंद्र मामीडवार समाजकार्य महाविद्यालय, खत्री महाविद्यालय तुकुम, छात्रवीर संभाजी राजे प्रशासकीय महाविद्यालय येथील विद्यार्थी आणि प्राध्यापक यांनी सहभाग घेतला होता.

यावेळी प्रा. योगेश दुधपचारे, किशोर जामदार, सुभाष शिंदे, प्रा. डॉ. पुरुषोत्तम माहोरे, प्रा. डॉ. संतोष कावरे, प्रा. डॉ. रमेश बोंडे, प्रा. डॉ. कुलदीप गोंड, प्रा. डॉ. निखील देशमुख, प्रा. डॉ. सचिन मिसाळ, नाजिज काजी उषा खंडाळे, वंदना गिरडकर यांच्यासह विविध महाविद्यालयाच्या प्राध्यापकांची व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. तर संस्थेचे नितीन रामटेके, अनिल अडगुरवार, धर्मेंद्र लुनावत, ओमजी वर्मा, राजू काहीलकर, आकाश घोड़मारे, सचिन धोतरे, संजय सब्बनवार, अनिकेत दुर्गे, कपिल चौधरी, प्रितेश जीवने आदीसह अन्य सदस्य यांनी सहकार्य केले.

बैठा सत्याग्रह च्या मागण्या पुढीलप्रमाणे : –

  • रामाळा तलावाच्या आतील तुटलेल्या भिंतीचे बांधकाम येत्या दोन महिन्यात तातडीने पूर्ण करणे.
  • रामाळा तलाव एक देउळ ते बगड खिडकी किल्ल्यास लागून संरक्षण भिंतीचे बांधकाम करणे.
  • बगड खिडकी ते अंचलेश्वर मंदीर ‘हेरीटेज वॉक’ मार्गातील किल्ला भिंतीचे आवश्यक ठिकाणी दुरस्तीचे कार्य त्वरीत करणे.
  • रामाळा तलाव ते बगड खिडकी, बगड खिडकी ते रामटेके वाडी पर्यत किल्ला भिंत व संरक्षण भिंतीच्या मध्ये पाथवे, सायकल ट्रॅकचे बांधकाम पूर्ण करणे.
  • चंद्रपूर शहर ऐतिहासिक स्मारक स्थळांचे पर्यटन विकासाकरीता ‘हेरीटेज वॉक’ उपक्रम भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून राबविले जाईल, याबाबत नियोजन करणे.
  • चंद्रपूर किल्ला परकोट पर्यटन विकासाकरिता चंद्रपूर शहर महापालिका सोबत ‘सामजंस्य करार’ करणे.
  • चंद्रपूर किल्ला परकोटाच्या सभोवताल बुरूज असलेल्या ठिकाणी मोकळया जागेत महापालिका सोबत ‘हेरीटेज उद्यान’ विकसित करणे.
  • परकोटास लागून बांधकाम करण्यात आलेले संरक्षण भिंतीचे लोखंडी ग्रील चोरीच्या घटनेत वाढ झाल्याने त्यावर नियत्रंण आणून कार्यवाही करणे.
  • चंद्रपूर शहरातील किल्ला परकोट संरक्षित स्मारक असल्याने परकोटाच्या मुख्य दरवाजे व खिडक्या वगळता अन्य ठिकाणी नियमात शिथिलता आणण्याच्या दृष्टीने कार्यवाही करणे.
  • जटपुरा गेटमधील वाहतुकीचा प्रश्न निकाली काढण्याबाबत सुचविण्यात आलेल्या उपाययोजना बाबत सकारात्मक निर्णय घेणे.
  • परकोटा सभोवताल संरक्षण भिंतीचे काम पुर्णत्वास नेण्याकरीता किल्ला-परकोट अतिक्रमण मुक्त करण्यास भिंतीस लागून असलेल्या घरांना पर्यायी घरे ‘पंतप्रधान आवास योजना’ मधून देण्यात यावे, आदी मागण्यांचा समावेश आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button